आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा बिन लादेनबाबतचा दावा अमेरिकेने फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अल कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा अमेरिकेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने दिला होता, हा दावा अमेरिकेने मंगळवारी फेटाळून लावला. एका अमेरिकी पत्रकाराने हा दावा करताना म्हटले होते की, आयएसआयच्या या अधिकाऱ्याने २.५ कोटी डॉलरच्या हव्यासापोटी अमेरिकेला लादेनची माहिती पुरवली होती.

व्हाइट हाऊसच्या सुरक्षा परिषदेेचे प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी हा दावा फेटाळताना नमूद केले आहे की, हा दावा बिनबुडाचा आहे. यात तथ्यांश नाही. मुळात पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात लादेनचा ठावठिकाणा लागल्यानंतर अमेरिकेने जी कारवाई केली त्याबाबत अगदी मोजक्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाच माहिती होती. अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सीआयएचे माजी संचालक माईक मॉरेल यांनी हा दावा फेटाळून लावताना यातील प्रत्येक शब्द निखालस खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच, सीएनएन वाहिनीचे संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक पीटर बर्जन यांनी संबंधित पत्रकाराने १० हजार शब्दांची जी कहाणी रचली त्यावरून हा पत्रकार नवे काहीच सांगत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेतील एनबीसी या वृत्तवाहिनीने ओसामाचा ठावठिकाणा पाकिस्तान सरकारला माहीत होता, असे म्हटले आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाहिनीनेही आयएसआयच्या एका माजी अधिकाऱ्याने लादेनची माहिती अमेरिकेला पुरवल्याचा दावा केला.
मोजक्या अधिकाऱ्यांनाच माहीत होती कारवाईची योजना

इनाम अडीच कोटी डॉलर...
अमेरिकेवर २००१ मध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारती विमाने धडकावून उद््ध्वस्त करण्यात आल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्यात अल कायदाचा तत्कालीन प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेने त्याची अचूक माहिती देणाऱ्यासाठी अडीच कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. या बक्षिसाच्या रकमेपोटीच आयएसआयच्या अधिकाऱ्याने लादेनची खडान््खडा माहिती अमेरिकेला पुरवल्याचे शोधपत्रकार व लेखक सेमर एम. हर्श यांनी आपल्या बातमीपत्रात म्हटले होते.

>आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने पैशाच्या हव्यासापोटी ठावठिकाणा कळवल्याचा पत्रकाराने केला होता दावा
>पाकिस्तानातील एबोटाबाद या शहरात अमेरिकी सैनिकांनी केलेल्या धडक कारवाईची माहिती दस्तुरखुद पाक सरकारलाही नव्हती.
>सीआयएसह व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दाव्यात तथ्यांश नसल्याचे सांगितले.

ऑगस्ट २०१०...
पाकची गुप्तहेर संस्था आयएसआयमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने ऑगस्ट २०१० मध्ये अमेरिकी वकिलातीत जोनाथन बंक यांच्याशी संपर्क साधला. अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला लादेनचा सविस्तर ठावठिकाणा सांगण्याची तयारी या अधिकाऱ्याने दाखवली. मात्र, त्याला यापोटी २००१ मध्ये अमेरिकेने लादेनवर ठेवलेले अडीच कोटी डॉलरचे बक्षीस हवे होते. येथूनच सूत्रे हलली आणि मे २००१ मध्ये अबोटाबादमध्ये क्रूरकर्मा लादेन मारला गेला.

श्रेय अमेरिकेचेच
लादेनविरुद्ध जी कारवाई करण्यात आली त्याचे श्रेय फक्त अमेरिकेचे आहे, असे प्राइस यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले. या कारवाईची अमेरिकेत इतर कोणत्या सुरक्षा यंत्रणा तर सोडाच, ज्या पाकिस्तानात ही कारवाई करण्यात आली तेथील सरकारलाही कानोकान खबर नव्हती, असा दावा प्राइस यांनी केला. फक्त अमेरिका आणि अमेरिकेचीच ही कारवाई होती, असे त्यांनी ठासून सांगितले.