आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan\'s First Indigenous Drone Kills 3 Militants

पाकिस्तानकडून अतिरेक्यांवर पहिल्यांदाच देशी ड्रोनचा हल्ला; तिघांना कंठस्‍थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानने देशी बनावटीच्या मानवरहित विमानाद्वारे (ड्रोन) दहशतवाद्यांच्या तळांवर सोमवारी हल्ला केला. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ ही कारवाई झाली. त्यात किमान ३ दहशतवादी ठार झाले. घटनेत दहशतवाद्यांचे महत्त्वाचे कमांडर ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

बुराक नावाचे हे ड्रोन पाकिस्तानी तंत्रज्ञांनी विकसित केले आहे. उत्तर वझिरिस्तानच्या शावल भागात ड्रोन हल्ला झाला. त्यात महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम बाजवा यांनी ट्विट करून दिली. पाकिस्तानी लष्कर गेल्या वर्षीपासून शावल भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्याने मोहिमा राबवत आहे. जून २०१४ मध्ये पाकिस्तानने उत्तर वझिरिस्तान भागात जोरदार मोहिम सुरू केली होती. अफगाण सीमेवरील या प्रदेशावर अल-कायदाचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. आदिवासी भागात अमेरिकेने ड्रोन हल्ला केला होता. त्यात शेकडो ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन विकसित करण्यास सुरूवात केली होती. त्या अगोदर पाकिस्तानने आपल्या भूमित ड्रोन हल्ले करण्यास अमेरिकेला कडाडून विरोध केला होता. ही भूमिका वारंवार मांडण्यात आली होती. त्यासाठी निषेधही करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही अमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवले नव्हते.
‘बुराक’ची मार्चमध्ये चाचणी
पाकिस्तानच्या वझिरिस्तान भागात अमेरिकेने सातत्याने ड्रोन हल्ल्याची कारवाई करून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले होते. त्यानंतर देशातून सरकारच्या विरोधात अविश्वास आणि असंतोषाची भावना निर्माण झाली होती. तेव्हापासून ड्रोनची गरज व्यक्त होत होती. त्यानंतर याचवर्षी मार्चमध्ये बुराकचे काम पूर्ण झाले आणि त्याची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे आता हे तंत्रज्ञान पाकिस्तानकडे उपलब्ध झाले आहे.
अतिरेक्यांना फंडिंग करणारी २०० बँक खाती गोठवली
पाकिस्तानला देशातील दहशतवादी संघटनांची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळेच सरकारने दहशतवाद्यांना निधी पुरवणारी २०० बँक खाती गोठवली आहेत. मदरशांच्या निधीवर करडी नजर आहे. या संस्था आणि त्यांच्या कार्यक्रमांना सरकारी परवानगी नसल्याचे आढळून आल्याने सरकारचे डोळे उघडले. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली असावी. पेशावर येथील शाळेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय कृती आराखडा (एनएपी) यंत्रणेद्वारे देशात दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दहशतवाद्यांची बँक खाती, देणग्या, निधींच्या स्रोताचा शोध सुरू आहे.