आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदलाविरोधी कराराला अखेर मंजुरी, पृथ्वीच्या संरक्षणासाठी 196 देशांची एकजूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पृथ्वीचे तापमान २ अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवण्याचा दंडक मान्य करून भारतासह १९६ देशांनी पर्यावरणविषयक ऐतिहासिक कराराला अखेर मंजुरी दिली. पृथ्वीच्या संरक्षणासाठी एकजुटीचे अभूतपूर्व दर्शन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने झाले. त्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले.

दोन आठवड्यांपासून पॅरिसमध्ये ही परिषद सुरू होती. त्यात सुमारे २०० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दोन आठवड्यांच्या चिंतनानंतर मतभेद निवळले आणि कराराच्या मसुद्यावर १९६ देशांची सहमती झाली. त्यानुसार कार्बन उत्सर्जनात घट करण्याचा संकल्प करण्यात आला. हा करार सहमती दर्शवणाऱ्या सर्व देशांसाठी कायद्याने बंधनकारक राहणार आहे. ग्रीन हाऊस गॅस रोखण्यावर उपाययोजना केली जाणार आहे. करारावर सहमती झाल्याचे जाहीर झाले. या वेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा आेलांद यांच्यासह उपस्थित सर्व देशांच्या नेत्यांनी हात उंचावून आनंद साजरा केला. दरम्यान, कोपनहेगनमध्ये २००९ मध्ये झालेल्या बैठकीनंतरही कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले होते. त्या वेळी अनेक देशांनी त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता.
करारातील मुद्दे
{ग्रीन हाऊस गॅसेस रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे.
{जागतिक तापमान २ अंश सेल्सियसपेक्षा कमी करून ते १.५ सेल्सियस अंशावर आणणे. कार्बन उत्सर्जन रोखण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरत आहेत, याचे दर पाच वर्षांनी परीक्षण करणे.
{२०२० पर्यंत विकसनशील देशांना १०० अब्ज डॉलर्सची मदत देणार.

"कोणीही विजयी की पराभूत नाही': हवामान बदलाच्या विरोधातील करारावर सहमती झाली आहे. ही वातावरणाच्या पातळीवरील न्याय्य भूमिका आहे. त्यामुळेच यात कोणी विजयी किंवा पराभूत झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भावना मांडल्या आहेत.

करार निश्चित चांगला : जावडेकर काही कायदेशीर बाबी निश्चित झाल्या. याचा आनंद वाटतो. त्यामुळे करार नक्कीच चांगला म्हणता येईल. परंतु विकसित देशांनी पूर्वीच्या चुकांची जबाबदारी घ्यायला हवी होती.
बातम्या आणखी आहेत...