आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐनवेळी रेस्तराँ बदलले नसते तर आमचा जीव गेला असता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसहून भास्कर'साठी दीपक बोहरा- (पॅरिसमध्ये भारतीय वकिलातीत कार्यरत होते. ते सध्या तीन आफ्रिकी देशांच्या पंतप्रधानांचे सल्लागार आहेत.)

फ्रान्स, विशेषत: पॅरिस शहरासाठी कला, संस्कृती, फॅशन आणि प्रेमभावना महत्त्वाचे घटक आहेत. भारतीय विदेश सेवेतील अधिकारी म्हणून मी पॅरिसमध्ये कार्यरत हाेतो. इथे कधीही भांडण-तंटे अनुभवण्यास मिळत नाहीत. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या घटनेने सर्वच सुन्न झाले. शुक्रवारी रात्री साधारण पावणेनऊ वाजता मी आणि अन्य काही जण भारतीय दूतावासाकडून येत होतो. सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. माघारी परतत असताना आम्ही कंबोडियन पद्धतीचे जेवण करण्याचे ठरवले. यानंतर आम्ही ज्या कंबोडियन रेस्तराँच्या दिशेने निघालो तिथे दहशतवादी हल्ला झाला. आम्ही रेस्तराँमध्ये पोहोचलो तेव्हा आमच्यातील काही जण म्हणाले, खूप भूक लागलीय, कंबोडियन जेवण तयार व्हायला वेळ लागेल. त्यामुळे चायनीज फूडचा पर्याय चांगला आहे. सर्वांनी कंबोडियन जेवण करावे, अशी माझी इच्छा होती. मात्र सर्वांपुढे माझा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. आम्ही या रेस्तराँच्या गेटसमोरून माघारी फिरलो आणि थोड्याच अंतरावरील एका चायनीज रेस्तराँमध्ये गेलो. तिथे गेलो ना गेलो तोच आम्हाला आवश्यक कामासाठी हॉटेल मेरियटमध्ये जाणे भाग पडले. येथील प्रसिद्ध सोएजे लिजे रस्त्यावरील हे हॉटेल पॅरिसची ओळख प्रसिद्ध आयफेल टॉवरपासून जवळपास दीड किमी अंतरावर आहे. इथे आल्यानंतर आपल्या सवयीनुसार मी हॉटेलबाहेर सायंकाळचा फेरफटका मारण्याचे ठरवले. माझ्यासोबत सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि पद््मविभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक आणि अन्य काही जण होते. मी निवृत्त आयएफएस असल्याने आणि आमच्या शिष्टमंडळात विविध मान्यवर होते. त्यामुळे आम्हाला प्रोटोकॉलनुसार सुरक्षा मिळाली आहे. आम्ही हॉटेलबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि खोलीची चावी स्वागत डेस्कवर ठेवण्यास गेलो तेव्हा त्यांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिला. यादरम्यान हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेच सांगितले.

जवळच्याच कंबोडियन रेस्तराँमध्ये हल्ला झाल्याचे एेकले तेव्हा धक्काच बसला. आम्ही रेस्तराँचे नाव विचारले तेव्हा त्यांनी आम्ही ज्या रेस्तराँमधून परत आलो होतो त्या ली-पेटिट कंबोजचे नाव सांगितले. एवढेच नव्हे तर हल्ल्याची वेळही आम्ही परत आल्यानंतर पाच मिनिटांची होती. याचा अर्थ आम्ही तिथे जेवत असलो असतो तर आमच्यातील बहुतांश लोक या जगात राहिले नसते. या सर्व कल्पनेनेच पोटात कालवले. या हल्ल्यातून सुटका झाल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले. प्रत्येकाचे दैव बलवत्तर असल्याचे सांगत एकमेकांना धन्यवाद दिले आणि खोलीच्या दिशेने वळलो. खोलीत गेल्यावर लगेच टीव्ही सुरू केला. अनेक ठिकाणी हल्ला केल्याचे समजले. यानंतर मी भारतीय दूतावासाला फोन लावला. एकापाठोपाठ एक हल्ले झाल्याचे त्यांनी सांगितले. अतिरेक्यांनी येथील राष्ट्रीय स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर अनेक ठिकाणी रसायन चिकटवले होते. जीव वाचवण्यासाठी पळणाराही यातून सुटू शकत नव्हता. अतिरेक्यांनी पकडल्या जाण्याच्या स्थितीत स्वत:ला उडवून देण्यासाठी स्फोटकांनी भरलेले जॅकेट घातले होते. पळणाऱ्या लोकांवर त्यांनी स्फोटके फेकण्यास सुरुवात केली. त्या वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रेक्षकांत होते. स्फोटानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर नेले. ते तिथून गृह मंत्रालयात गेले व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सूत्रे घेतली. मी फ्रान्स आणि पॅरिसकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. हा देश आणि शहर कला, प्रेम, संस्कृती आणि फॅशनचे प्रतीक आहे. याच कारणामुळे दोन वर्षांपूर्वी पत्नीसोबत लग्नाचा वाढदिवस इथे साजरा केला. जगात कुठेच, कधीही अशी स्थिती ओढवू नये, अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो.जगात सद्््भावना राहावी. सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये अाहोत. सर्व विमान उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही. काही विमान उड्डाणे रोखली आहेत. सर्व उड्डाणे रद्द केली जात नाहीत. मात्र, आणीबाणीमुळे ही उड्डाणे विलंबाने होत आहेत. िवमानसेवा सुरळीत झाल्याची माहिती देऊ, असे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले आहे. आता आम्ही त्यांच्या संदेशाची वाट पाहत आहोत.
(शब्दांकन : संतोष ठाकूर)
बातम्या आणखी आहेत...