आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटाने दिली साक्ष; मालकीण ठरली दोषी; 2015 मध्ये पत्नीने केली पतीची गोळी झाडून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशिगन (अमेरिका)- अमेरिकेतील एक महिला पोपटपंचीमुळे दोषी ठरल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील न्यायालयाने पोपटाची साक्ष ग्राह्य धरत निकाल सुनावला. मिशिगनमध्ये एका महिलेला पतीच्या हत्या प्रकरणात पोपटाच्या साक्षीच्या आधारे तिला दोषी ठरवले आहे. 

त्याचे झाले असे, ग्लेन्ना दुरम या महिलेने २०१५ मध्ये पोपटासमोर पती मार्टिनवर गोळी झाडली हाेती. ग्लेन्नाने मार्टिनवर एक-दोन नव्हे, पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेवेळी घरात एकटा पोपटच होता. बड नावाच्या या  पोपटाने  नंतर घरातील इतर सदस्यांना मार्टिनचे अखेरचे शब्द ऐकवले होते. सुनावणीदरम्यान मार्टिनची पहिली पत्नी क्रिस्टिना केलरने कोर्टाला पोपटाची व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवली. तिने न्यायालयाला सांगितले की, आम्ही घरी गेलो तेव्हा पोपट मार्टिनच्या अावाजात वारंवार गोळी झाडू नको, अशी गयावया करत होता. याच आधारे न्यायालयाने ४९ वर्षीय ग्लेन्नाला हत्येसाठी दोषी ठरवले. ग्लेन्नाला पुढील महिन्यात शिक्षा सुनावली जाईल. बड  या दक्षिण आफ्रिकी पोपटाला सुनावणीसाठी आणण्यात आले नाही. वकिलाने पोपटाच्या साक्षीसाठी विनंती केली, कोर्टाने त्यास नकार दिला. 

मिशिगनच्या सँड लेक येथील या घटनेत ग्लेन्नाच्या डोक्याला दुखापत झाली. मात्र, त्यात ती बचावली.  मार्टिनची आई निकाल ऐकण्यासाठी कोर्टात उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, कोर्टात ग्लेन्नाला पाहून खूप दु:ख वाटले. दोषी ठरवूनही तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची रेष नाही. न्यायाला झालेला विलंब योग्य नाही. पोपट कोणतेही बोल पकडतो. त्याची वाणी शुद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. मार्टिनची पहिली पत्नी क्रिस्टिना आता पोपटाची देखभाल करत आहे. ती म्हणाली, हत्येदिवशीचा घटनाक्रम पोपट सांगत असे. यात तो गोळी झाडू नको, या वाक्यावर येऊन थांबत असे. ग्लेन्ना व मार्टिनमध्ये घरावरून वाद होते. मार्टिनचा खून त्याच्या घराचा लिलाव होण्याच्या एक महिना आधी झाला होता. ग्लेन्नाला या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...