आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठमांडू सुन्न, पशुपतिनाथाची आरती निर्विघ्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - राहून राहून बसणारे भूकंपाचे धक्के सहन करत दिवस उजाडण्याची वाट पाहणारे काठमांडू पहाट होताच तंबू कनातींतून रस्त्यावर आले. शहरात कमालीची पळापळ आणि अस्वस्थता आहे. बसस्टँड आणि विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तोबा गर्दी आहे. सकाळपासूनच त्रिभुवन विमानतळावर देशी-परदेशी पर्यटक जमलेले आहेत. सर्वांना येथून निघण्याची घाई आहे. विमानतळाच्या डिपार्चर गेटवर आपला नंबर येण्याची वाट पाहणारा आयर्लंडचा पीटर गफ म्हणाला, शनिवारी भूकंप आला तेव्हा मी भक्तपूर दरबारात फिरत होतो. आम्ही जिवंत आहोत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मदुराईहून आलेल्या सी.एन. रामास्वामीने सांगितले, १५ जणांसोबत पशुपतिनाथाचे दर्शन पर्यटनासाठी आलो होताे. दर्शन तर झालेच; पण भूकंपात जीव वाचल्याने साक्षात देवच भेटल्याची भावना मनात आली. अख्ख्या शहरात स्मशानशांतता आहे. सर्वकाही जेथे होते तेथेच थांबले आहे. हालचाल आहे ती पशुपतिनाथ मंदिरामागे असलेल्या बागमती नदीच्या किनाऱ्यावर. येथे शेकडो चिता धगधगत आहेत. परिजनांच्या अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत लोक तासन््तास घाटांवर बसलले आहेत. दुपार होत होत पुन्हा जमीन हादरू लागली. जो तो पळू लागला. घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत राहिलेली नाही. अलबत, काही तरुण आयुष्य धोक्यात घालून बचाव कर्मचाऱ्यांसोबत ढिगारे उपसत आहेत, जेणेकरून एखाद्याचे आयुष्य वाचवता येईल.

मंदिरातून बाहेर येत भक्तपूर दरबारात पोहोचलो तर तेथे नेपाळी फौजांचे जवान तैनात होते. एकाने सांगितले की, तो ताजुल मंदिराच्या दरवाजावर तैनात होता. येथे फक्त हिंदूंनाच प्रवेश असतो. भूकंपाच्या वेळी तेथे डझनभर चिनी पर्यटक उपस्थित होते. शिपाई कुलबहादूर शास्त्री शिवराम म्हणाले की, भूकंप येताच चिनी पर्यटकांनी दोघांना धरले अन् भिंतीला खेटून उभे राहिले. ईश्वरकृपेने भिंत पडली नाही, अन्यथा सर्व चिनी पर्यटक त्याखाली गाडले असते.
या परिसरात सुमारे ३०० वर्षांपूर्वी निर्मित कुंवारी मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. ते कोसळताच संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उडाले. इतक्यात तेथे आणखी एक जुने मंदिर कोसळले. सोबतच भक्तपूर दरबारचा एक भागही नुकसानग्रस्त झाला.
संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मी पशुपतिनाथ मंदिरात आलो. आरतीची तयारी सुरू असल्याचे दिसते. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले होते. मनांत आप्तस्वकीयांना गमावल्याचे दु:ख होते. मात्र भोलेबाबावर एकही नाराज नव्हता. आरती झाली. त्याच विश्वास श्रद्धेने, जशी शतकांपासून होत आली आहे.

अनागोंदीचा फायदा उचलण्यात विमान कंपन्याही मागे नाहीत. सर्वसाधारणपणे काठमांडूहून दिल्लीचे विमान तिकीट पाच हजार रुपये असताना कंपन्या प्रवाशांकडून एका तिकिटासाठी २० हजार रुपये वसूल करत आहेत. भारत सरकारने काठमांडूत अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी वायुदलाचे विमान पाठवल्याची माहिती मिळताच विमानतळावर पुन्हा तोबा गर्दी झाली.