आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलीच्या अध्यक्षांची बराक ओबामांना शिवीगाळ, नंतर दिलगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएनटिएन- फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटेर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्यावरील वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. आेबामा दुष्ट माणूस आहे, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते.

रॉड्रिगो यांनी यापूर्वीदेखील जागतिक नेत्यांबद्दल वादग्रस्त विधाने केलेली आहेत. पोप, संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांबद्दलही त्यांनी अगोदर वक्तव्य केले होते. वक्तव्य केल्याच्या काही तासांतच त्यांनी घूमजाव करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विधान अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचे असल्याने जगभरातून रॉड्रिगो यांच्यावर टीका झाली होती. लाआेसला जाण्यापूर्वी रॉड्रिगो यांनी सोमवारी ही मुक्ताफळे उधळली होती. लाआेसला आंतरराष्ट्रीय आसियान प्रादेशिक परिषद होणार आहे. त्यात आेबामा त्यांच्याशी चर्चाही करणार होते. दक्षिणेकडील सागरी भागात अमेरिकेने फिलिपाइन्सला सुरक्षेच्या क्षेत्रात नेहमीच मदत केली आहे. त्याशिवाय व्यापार क्षेत्रातही उभय देशांची भागीदारी आहे. चीनसोबत दोन हात करताना फिलिपाइन्सला नेहमीच अमेरिकेच्या सहकार्याची गरज भासत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केलेले वक्तव्य चुकीचे होते, याची जाणीव रॉड्रिगो यांना झाली असावी.

काय आहे वाद ?
लाआेसला जाण्यापूर्वी रॉड्रिगो यांनी आेबामांविषयी शिवराळ (सन ऑफ बीच) भाषेचा वापर केला होता. लाआेसमध्ये भेटल्यानंतर कृपया मानवी हक्काबद्दल भाषण देऊ नये, असे त्यांनी वक्तव्य केले होते. वास्तविक अमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील मोहिमेमुळे रॉड्रिगो अगोदरच वादात आहेत. त्या मोहिमेत गेल्या दोन महिन्यांत सुमारे अडीच हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत.

द्विपक्षीय बैठक रद्द
फिलिपाइन्स राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी दिली. ही बैठक रद्द झाली असून आेबामा आता दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. तत्पूर्वी ही बैठक झाली असती तर नक्कीच काहीतरी चांगले निष्पन्न झाले असते. परंतु ते होऊ शकलेले नाही, असे आेबामा यांनी चिनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...