आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाच्या अर्कापासून तयार केले प्लास्टिक; स्पेनमधील रासायनिक संशोधन केंद्रातील संशोधकाचे यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- प्लास्टिकच्या वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या संशोधनात आता एक यशस्वी भर पडली आहे. कॅटालोनिआ संशोधन केंद्रातील संशाेधकाने लिंबाचा अर्क आणि कार्बन डायऑक्साइडच्या मिश्रणातून प्लास्टिकची निर्मिती केली आहे. या प्लास्टिकमधून फोन कव्हर, बाटल्या आणि डीव्हीडीसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवता येईल, असा संशोधकांचा दावा आहे. स्पेनमधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल रिसर्च ऑफ कॅटालोनिआतील (आयसीआयक्यू) संशोधक अर्जान क्लेइज यांनी हे पॉलिकार्बोनेट्स तयार केले आहे. त्यांनी सांगितले की, पॉलिकार्बोनेट्स तयार करण्यासाठी लिमोनेन, कार्बन डायऑक्साइड तसेच नैसर्गिक घटकांचा वापर केला. 

सध्या वापरल्या जात असलेल्या पॉलिकार्बोनेट्स-बिसफेनॉल ए (बीपीए) या घातक रासायनिक घटकास लिमोनेन हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, अमेरिकेसह युरोपातील काही संशोधक संस्थांनी बीपीए हे सुरक्षित रसायन असल्याचे म्हटले आहे. तर, फ्रान्स, डेन्मार्क आणि तुर्कीसारख्या काही देशांनी बेबी बॉटल्सच्या उत्पादनात बीपीए वापरण्यावर बंदी घातली आहे. बीपीए हे सुरक्षित आहे, पण ते पेट्रोलियम घटकांपासून तयार केले जाते. बीपीएला लिंब तसेच संत्र्याच्या सालीपासून तयार लिमोनेनच्या माध्यमातून एक चिरंतन पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. पण बीपीएला पूर्णपणे डावलून केवळ लिमोनेनचा वापर करणे सध्याच्या घडीला बहुतांश क्षेत्रांना शक्य नाही. सुरुवातीला अल्पप्रमाणात याचा वापर करून हळूहळू बीपीएचा वापर टाळल्यास फायद्याचे ठरेल, असेही क्लेइज यांनी स्पष्ट केले.  

प्लास्टिकचे औष्णिक गुणधर्म सुधारण्यात यश  
या संशोधनाच्या माध्यमातून क्लेइज यांनी फक्त पर्यावरणपूरक प्लास्टिकच तयार केले नाही तर त्या प्लास्टिकचे औष्णिक गुणधर्म सुधारण्यातही त्यांना यश आले आहे. लिमोनेनच्या या प्लास्टिकने पॉलिकार्बोनेटसाठीचे आजवरच्या सर्वोत्तम ‘ग्लास ट्रान्झिशन’ तापमान नोंदवले. हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण सामान्य प्लास्टिकच्या तुलनेत आजवर जैवप्लास्टिकमध्ये अत्यंत वाईट औष्णिक गुणधर्म आढळून आले आहेत, असे क्लेइज यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...