आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांना सर्वतोपरी मदत, पंतप्रधानांची जर्मनीत हमी, उद्योजकांना जाहीर निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅनोव्हर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी दौ-या च्या दुस-या दिवशी उद्योग-व्यवसायावर भर दिला. त्यांनी सुरुवातीस जर्मन चान्सेलर अँजेला मर्केल यांच्यासोबत हॅनोव्हर औद्योगिक मेळाव्यात भारतीय पॅव्हेलियनचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी जर्मन गुंतवणूकदारांना मेक इन इंडियासाठी निमंत्रण दिले. भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब करण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडो-जर्मन व्यापार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील आघाडीच्या उद्योगपतींना जुन्या संकल्पना आिण समज सोडून देत भारतात येण्याचे निमंत्रण दिले. धोरणातील बदल अनुभवा. मेक इन इंडिया एक आवश्यकता आहे. भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

त्याआधी भारतीय पॅव्हेलियनच्या उद््घाटनावेळी मोदी म्हणाले, डेमोग्राफी, डिमांड आणि डेमोक्रसी हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या गोष्टीमुळे जग भारताकडे आकर्षित होत आहे. केवळ जर्मनीच नव्हे, तर संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या वेळी मर्केल म्हणाल्या, तरुण लोकसंख्या ही भारताची शक्ती असून त्यांना रोजगार हवा आहे. त्यांना देश पुढे जात असलेला पाहायचा आहे. तुमचा देश निश्चितच एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पंतप्रधानांनी भारतीय स्टॉल व प्रदर्शनही पाहिले. त्यांनी चान्सेलरना चहा आणि स्नॅक्स दिले.

भारत जागतिक विकासाचे मुख्य इंजिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील आघाडीचे वृत्तपत्र "फ्रँकफर्टर एल्जेमिन जिटंग'मध्ये विशेष लेख लिहिला आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, भारताला जागतिक विकासाचे मुख्य इंजिन म्हणून मला पाहावयाचे आहे. त्या दिशेने भारताने प्रयत्नही सुरू केले आहेत. तसे सकारात्मक वातावरणही जगभरात निर्माण होत आहे. आमची लोकशाही मूल्ये आणि व्यवहार कौशल्ये जगाला स्थैर्याची हमी देतात. आमच्याकडे मीडिया आणि न्यायपालिकेस संपूर्ण स्वातंत्र्य आहे. या संस्थांना कोणत्याही संकोचाविना आपले मत व्यक्त करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ही भारतासोबतच जागतिक संस्थांच्या दृष्टीनेही जमेची बाजू आहे.

भूसंपादनाच्या तरतुदी योग्यच : नरेंद्र मोदी
हॅनोव्हर । भूसंपादनाच्या कायद्यातील दुरुस्तीसाठी भारत सरकारने मांडलेल्या विधेयकात ज्या तरतुदी आहेत त्यात न्याय्य व योग्य नियमावली सरकारने दिली आहे. यात शेतकरी व इतर जमीन मालकांना त्रास होईल अशी एकही तरतूद नसल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली. सरकारने ही नियमावली सर्वंकष विचार करून तयार केली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जर्मनीतील हॅनोव्हर औद्योगिक प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. भूसंपादन विधेयकाला देशांतर्गत होणा-या विरोधासंदर्भात या वेळी मोदींनी सरकारची बाजू मांडली. हॅनोव्हर प्रदर्शनात जगभरातून गुंतवणूकदार आले आहेत. भारतात गुंतवणूक करण्यासाठी जमीन ही समस्या नसल्याचा संदेश या वेळी त्यांनी दिला. याविषयी सविस्तर माहिती न देता, बिझनेस समुदायाला त्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. पर्यावरणविषयक नियम, स्रोतांचे संतुलित वाटप व पारदर्शक प्रशासनाची हमी त्यांनी उपस्थितांना दिली. दूरगामी प्रकल्पांचे भारत सरकार स्वागत करत असून यातून आर्थिक विकास शक्य असल्याचे ते म्हणाले.

आैद्योगिक पर्यटनासाठी पुढाकार
अहमदाबाद। आैद्योगिक-पर्यटन पॅकेज विकसित करण्यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेतला आहे. महत्त्वाच्या उद्योग अास्थापनांना या पॅकेजअंतर्गत भेटी देण्याची योजना असून पर्यटकांना आकर्षित करण्यात यश मिळेल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
टाटा नॅनो प्रकल्प, पिपाव्हा पोर्ट, अलंग शिप ब्रेकिंग यार्ड, अमूल डेरी यांचा या पॅकेजमध्ये समावेश असेल. ‘इंडस्ट्रियल टूर ऑफ गुजरात’ नावाने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. गुजरात पर्यटन विकास महामंडळाद्वारे ही योजना राबवण्यात येईल. चीन व जर्मनीमध्ये असे आैद्योगिक-पर्यटन पूर्वीपासूनच राबवण्यात येते. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. या पॅकेजमध्ये राज्यातील खादी उद्योग, मिठागरे, हिरे व्यापार, जुन्या सूतगिरण्या या पारंपरिक उद्योग अास्थापनाही दाखवल्या जातील. सुरुवातीला हे पर्यटन पॅकेज ५ दिवसांचे ठेवण्यात येईल व त्यासाठी प्रत्येकी २० हजार खर्च येईल.