रियाध - दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. दहशतवादाला धर्मापासून वेगळे केल्यानंतरच त्याचे उच्चाटन होऊ शकेल. परंतु त्यासाठी जागतिक प्रयत्नांची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. माेदींच्या या दौऱ्यात भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात काही महत्त्वपूर्ण करारही झाले.
सौदी अरेबियाच्या दोनदिवसीय दौऱ्यात मोदी रविवारी बोलत होते. ‘चांगला’ किंवा ‘वाईट’ दहशतवाद असा फरक करता येत नाही. दहशतवादाला जात, रंग, धर्म असे काहीही नसते. सौदीने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत चांगले नेतृत्व केले आहे. मध्यपूर्वेत सौदीची कारवाई वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. त्याचबरोबर जग सुरक्षित होऊ शकेल. ही लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात मुळीच नाही. हा विचार केल्यास सौदीच्या नेतृत्वाला आम्ही मनापासून दाद देतो. मानवतेवर विश्वास असलेल्यांनी एकत्र यावे त्यासाठी दहशतवादाला धर्मापासून विलग केले पाहिजे. त्यानंतर पद्धतशीर प्रयत्नांद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे. भारत आणि सौदी दहशतवादाच्या उच्चाटनासाठी कटिबद्ध आहोत, असे मोदी म्हणाले. एका स्थानिक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. दहशतवादाला पराभूत करण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय या पातळीवर दोन्ही देशांत समन्वय आणि सुसंवादाची गरज आहे. दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या हस्तांतरणासाठी असलेली व्यवस्थाही दहशतवादाचा बीमोड करू शकते. भारताने त्यासाठी सकारात्मक अशी पद्धती स्वीकारलेली आहे.
गुंतवणूकदारांना आवतण : सौदी अरेबियातील गुंतवणूकदारांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. सरकारी आणि खासगी गुंतवणूकदारांनी स्मार्ट सिटी, रेल्वे, वीज, बंदरे, महामार्ग विकास क्षेत्रात गुंतवणूक करावी. त्यांचे सरकार स्वागत करेल, अशा शब्दांत मोदी यांनी सौदीतील कंपन्यांना आवाहन केले.
रियाधमधील महिला आयटी केंद्रात संवाद, सौदी व्यावसायिकांना निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सौदी दौऱ्यात राजधानीतील महिला माहिती तंत्रज्ञान केंद्राला आवर्जून भेट दिली व तेथील व्यावसायिकांशी संवाद साधला. महिलांना प्रशिक्षण देणारे हे केंद्र सौदेच्या कीर्तीमध्ये भर घालणारे आहे. तुम्ही सर्व भारताला भेट द्या. तुमचे नक्कीच स्वागत होईल. तुम्ही नक्की भारतात या. येथील वातावरण पाहून मी भारावून गेलो आहे. या माध्यमातून जगाला एक संदेश मिळतो, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. मोदींनी त्यांच्याशी ४० मिनिटे संवाद साधला. सौदीच्या या केंद्रांतर्गत सुमारे १ हजार महिला व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.