आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Pitches For Expanding Scale Of Cooperation With Tajikistan

ताजिकिस्तानशी बळकट सामरिक भागीदारी : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुशानबी - मध्य आशियातील पर्वतीय देश असलेल्या ताजिकिस्तानसोबत भारताची बळकट अशी सामरिक भागीदारी आहे. दहशतवादाच्या विरोधात परस्परांना सहकार्य करून द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. सहा देशांच्या दाैऱ्यातील अखेरच्या देशाला दिलेल्या भेटीदरम्यान ते सोमवारी बाेलत होते.

भारत-ताजिकिस्तान यांच्यात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एमोमाली रहेमान यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. दोन्ही देशांना दहशतवादाचा समान असा धोका आहे. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन द्विपक्षीय संबंधाला आणखी बळकट करण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जेणेकरून दहशतवाद आणि कट्टरवादाला परतवणे शक्य होणार आहे. मध्य आशियातील इतर देशांच्या तुलनेने ताजिकिस्तान भारताला अधिक जवळचा आहे. त्याशिवाय गेल्या आठवड्यात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एससीआे) सदस्यत्व भारताला मिळाले. ताजिकिस्तान या संघटनेचा अगोदरपासूनच सदस्य आहे. आता दोन्ही देशांच्या भागीदारीला नवा पैलू मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. त्या अगोदर मोदी किर्गिस्तानमधून रविवारी रात्री ताजिकिस्तानच्या येथे दाखल झाले होते.

मकबऱ्याची चित्रकृती भेट
१७ व्या शतकातील भारतीय कवी अब्दुल कादिर बेदिल यांच्या दिल्लीतील मकबऱ्याची चित्रकृती मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष रहेमान यांना भेट दिली. पर्शियन भाषेतील महान कवींमध्ये भारतीय कवी बेदिल यांना मानाचे स्थान आहे.बेदिल यांच्या नावे १६ कवितासंग्रह आहेत. त्यांचा जन्म पाटण्यात १६४४ मध्ये झाला होता. सुफी तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेले त्यांचे लेखन पर्शियन साहित्यात लोकप्रिय आहे.

शांततेसाठी महत्त्वाची भागीदारी
ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सरहद्द महत्त्वाची आहे. ताजिकिस्तानसोबत भारताने संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा करार केला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांचे तळ आहेत. दोन्ही देशांच्या सीमा जवळ असल्याने ताजिकिस्तानमध्ये शांतता गरजेची आहे. त्यानंतरच प्रादेशिक शांतता शक्य होऊ शकेल.
संपर्कावर भर
दहशतवादावर दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर भारत-ताजिकिस्तान यांच्यात यासंदर्भातील संपर्काला महत्त्व दिले जाणार आहे. संपर्काच्या इतर साधनांचाही वापर करण्यात येईल.

वाहतूक कॉरिडॉर
मध्य आशिया आणि दक्षिण आशिया यांना जोडणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या प्रस्तावावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे.
चाहबाहार बंदराचे बांधकाम भारताच्या गुंतवणुकीतून मध्य आशियात भारताने गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणजे इराणचे चाहबाहार बंदर आहे. म्हणून आगामी काळात संयुक्त प्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधीबाबत ताजिकिस्तानसोबत भागीदारी केली जाईल. त्यासाठी आराखडा तयार केला जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.