आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Says Permanent Membership Of UN Security Council Is 'our Right',

भारताला ‘दया’ नव्हे, हक्क हवा, सुरक्षा परिषद सदस्यत्वावरून मोदी यांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान मिळावे हा आमचा ‘हक्क’ आहे. परिषदेच्या सदस्यत्वासाठी ‘याचना’ करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सदस्यत्व मिळावे, असे आवाहन केले. दरम्यान, मोदी रविवारी सायंकाळी जर्मनीच्या हनोव्हरमध्ये दाखल झाले.

फ्रान्स दौऱ्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी शनिवारी सायंकाळी भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना मोदी यांनी ही भूमिका मांडली. जागतिक शांततेसाठी भारताने वारंवार प्रयत्न केले आहेत. पहिल्या महायुद्धापासून भारत अशा पद्धतीने वाटचाल करत आला आहे. त्यानंतरही भारताला सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी झगडावे लागत आहे. भारत ही महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांची भूमी आहे. यंदा संयुक्त राष्ट्र स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारताच्या मागणीचा विचार व्हायला हवा. म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या शांततेविषयक प्रामाणिक प्रयत्नांचा आदर करून ही संधी द्यावी. पूर्वीचा काळ राहिलेला नाही. तेव्हा भारत सदस्यत्वाची याचना करत होता.

आता मात्र आमचा देश आपला हक्क मागत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. सुमारे ३ हजार भारतीयांच्या समोर मोदी यांचे हे आत्मविश्वासपूर्ण उद््गार उमटताच उपस्थित भारतीयांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा करत त्यांचे जणू समर्थन केले.पहिल्या महायुद्धात १४ लाख भारतीयांनी सहभाग घेतला होता. देशाचा हजारो वर्षांचा इतिहास पाहा. भारताने कधीही आक्रमण केलेले नाही.

‘ट्री ऑफ लाइफ’ची भेट
फ्रान्स भेटीच्या शेवटी मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष फ्रान्कॉइस आेलांद यांना ‘ट्री आॅफ लाइफ’ हे चित्र भेट दिले. आेडिशाचे चित्रकार भास्कर महापात्रा यांनी रेखाटलेले हे चित्र आहे. वातावरण बदलावरील आगामी परिषदेच्या निमित्ताने मोदी यांनी चित्राद्वारे असा स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

पेन द्यावा तसे खाणपट्टे
एखाद्याने हातरुमाल किंवा पेन द्यावे याप्रमाणेच खाणपट्टे देण्याचे काम यूपीएच्या काळात झाले. त्यामुळेच लाखो कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारतीय समुदायासमोर बोलताना मोदींनी मागील सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला. अहो, एखाद्याला पेन देत असतानादेखील माणूस दहा वेळा विचार करतो.

तीन दिवसांचा दौरा सुरू
फ्रान्सचा दौरा आटोपून मोदी जर्मनीत पोहचले आहेत. जर्मनीचा त्यांचा तीन दिवसांचा दौरा असेल. त्यात ते ‘मेक इन इंडिया’चा कार्यक्रम राबवतील. पहिल्या दिवशी ते हॅनोव्हर येथील उद्योजकांच्या परिषदेचे उद््घाटन करतील. तत्पूर्वी त्यांची जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासोबत चर्चा होईल. जर्मनी हा भारताचा व्यापार क्षेत्रातील सर्वात मोठा भागीदार आहे.