ऑक्सफर्ड- मुलांमध्ये नैतिक मूल्य आणि संस्कार रुजावेत यासाठी ब्लॅकबर्ड लेज पोलिसांनी एक नवे पाऊल उचलले आहे. त्यानुसार कौन्सिलमध्ये जी मुले चांगली वर्तणूक करतील म्हणजे आई-वडिलांचा हात पकडलेला असेल किंवा हेल्मेट घालून बाइक चालवत असतील तर स्थानिक पोलिस अधिकारी त्यांना एक व्हाउचर देतील. हे व्हाउचर स्थानिक फूड चेनमध्ये देऊन त्या बदल्यात आइस्क्रीम किंवा आइस कँडी घेता येईल.
उन्हाळ्याच्या सुटीत मुलांवर संस्कार करण्यासाठी ऑक्सफर्डच्या सर्वात मोठ्या आणि समृद्ध कौन्सिल पोलिसांनी पथदर्शी प्रकल्पांतर्गत हा प्रस्ताव मांडला आहे. पोलिस कम्युनिटी सपोर्ट ऑफिसर अॅलेक्स बेंजामिन यांनी सांगितले की, मुलांनी असामाजिक वर्तणूक करू नये आणि त्यांच्या चांगल्या वर्तणुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना सुरू केली जात आहे. जी मुले रस्ता ओलांडताना आई-वडिलांचा हात पकडलेले दिसतील किंवा सायकल चालवताना हेल्मेट घालतील त्यांना आम्ही एक तिकीट देऊ.
ते म्हणाले की, सार्जंट लॉरेन्स कॅलेहर यांनी ही कल्पना सुचवली. आम्ही ती अमलात आणली. शेकडो तिकिटे छापली आहेत. ती पोलिस ठाण्यात ठेवली आहेत. उन्हाळ्याची सुटी संपेपर्यंत ही योजना सुरू राहील. चुकीची वर्तणूक असलेल्यांना लक्ष्य करणे हा आमचा उद्देश नाही. फक्त मुलांनी समाजाच्या फायद्यासाठी काही केले असेल तर त्यांना बक्षीस मिळावे हा हेतू. या योजनेबद्दल मी खूप उत्साहित आहे. परिणाम काय निघेल हे पाहण्याची इच्छा आहे.
दुसरीकडे, सोशल मीडियावर पोलिसांच्या या पावलावर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. योजनेबाबत तक्रारही करण्यात आली आहे. एका युजरने सोशल मिडियावर लिहिले की, ‘मुलांना बक्षीस स्वरूपात आईस्क्रीम व्हाउचर, तुम्हाला गांभीर्य आहे का?’ हे व्हाउचर पोहणे, टेनिस किंवा शारीरिक कसरतींसाठी हवे होते.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘शाळा सुरू झाली की कोणता मुलगा अडचणीचा आहे हे शिक्षकांना लगेच कळेल. जी चांगली मुले असतील त्यांचे वजन वाढलेले दिसेल. कारण आइस्क्रीमचा परिणाम हाच असेल.’