आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप कैरोत; मुस्लिमांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न, इसिसने इजिप्तमधून ख्रिश्चनांना संपवण्याची दिलीय धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो- इजिप्तमध्ये प्राचीन ख्रिश्चन समुदायावर इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांच्या धोक्याची टांगती तलवार असतानाच पोप फ्रान्सिस शुक्रवारी कैरोला पोहोचले. शांततेचा संदेश घेऊन आलेले पोप येथे दोन दिवस थांबतील. मुस्लिम जगतासोबत ख्रिश्चनांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणे हा त्यांच्या या दौऱ्याचा हेतू आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने इजिप्तमधून ख्रिश्चनांचा पूर्णपणे खात्मा करण्याची धमकी दिलेली आहे.   

पोप यांनी काही दिवसांपूर्वी इजिप्तच्या लोकांच्या नावे पोप यांनी एक संदेश जारी केला होता. त्यात त्यांनी हा दौरा शांततेची सुरुवात असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच इस्लामिक जगतासोबत समझौता होईल, असेही नमूद केले होते. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चनांच्या दोन चर्चमध्ये याच महिन्यात झालेल्या स्फोटांत ४५ लोक ठार झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही एका कॉप्टिक कॅथेड्रलमध्ये झालेल्या स्फोटात २८ लोकांना प्राण गमवावे लागले होते. सलग होणाऱ्या हल्ल्यांमुळे कॉप्टिक ख्रिश्चनांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बहुतेकांनी तेथून सुरक्षित ठिकाणी पलायनही सुरू केले आहे. कॉप्टिक ख्रिश्चनांची संख्या इजिप्तमधील लोकसंख्येच्या १० टक्के आहे. ते अनेक शतकांपासून बहुसंख्याक मुस्लिमांसोबत शांततेने राहत आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या आधी रोमन कॅथॉलिक पोप जॉन पॉल द्वितीय यांनी इसवी सन २००० मध्ये इजिप्तचा दौरा केला होता.
 
धोका असूनही सर्वसाधारण कारमध्ये फिरणार पोप 
शांततेचा संदेश घेऊन पोहोचलेले पोप हे दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही कैरोत फक्त एक सर्वसाधारण कारच वापरतील. ते येथे सुमारे २७ तास राहणार आहेत. यादरम्यान ते कॉप्टिक आॅर्थाडॉक्स चर्चचे मुख्य फादर, पोप तावाड्रेस द्वितीय आणि राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल-सीसी यांचीही भेट घेतील. ते अल-अझहर मशिदीचे मौलाना अहमद अल-तैयब यांनाही भेटतील.
 
मध्य पूर्वेत ख्रिश्चनांना लक्ष्य करतेय आयएस 
आयएस ही दहशतवादी संघटना इराक आणि सिरियासह जेथे-जेथे सक्रिय आहे, तेथे ख्रिश्चनांना थेट लक्ष्य करत आहे. येशू ख्रिस्तांचे जन्मस्थळ आणि जुन्या चर्चेसचे स्थळ असलेल्या मध्य पूर्वेतील ख्रिश्चनांचे भवितव्य धोक्यात टाकण्याची आयएसची योजना आहे.
 
बातम्या आणखी आहेत...