ओटावा - कॅनडामधील सार्वत्रिक निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांचा सपशेल पराभव झाला. लिबरल पक्षाचे जस्टिन त्रुदो नवे पंतप्रधान होतील. दरम्यान, या बदलामुळे देशात वांशिक वाद पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. जस्टिन यांचे वडिल पियरे त्रुदो यांनी १६ वर्षे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कारकीर्द गाजवली. हा काळ त्रुदोमेनिया म्हणून ओळखला जातो.
सोमवारी रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार लिबरल पक्षाला संसदेच्या ३३८ पैकी १८४ जागा मिळाल्या आहेत. यामुळे जस्टिन यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आता इतर कोणत्याही पक्षाची गरज राहणार नाही. कन्झर्व्हेटीव्ह पक्षाला केवळ ९९ जागांवर समाधान मानावे लागले.