आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरले, 32 मृत्यू; लाखो लोकांची रात्र रस्त्यावरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सिटी- मेक्सिकोगुरुवारी रात्री भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्याने हादरले. भूकंपाच्या धक्क्याने किमान ३२ जणांचा मृत्यू झाला. प्रदेशात सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात हा भूकंप शतकातील सर्वात मोठा भूकंप ठरला आहे. त्याची तीव्रता ८.२ रिश्टर अशी नोंदवण्यात आली आहे. सुमारे १० लाख लोकांना सुरक्षेमुळे गुरुवारची रात्र रस्त्यावरच काढावी लागली. 

टोनाला सागरकिनाऱ्यावर भूकंपाचे जबर हादरले जाणवले. रात्री ११.४९ च्या सुमारास देशाच्या दक्षिणेकडील चियापास प्रदेशात घरांची पडझड झाली. अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या टाबास्को राज्यात भूकंपामुळे झालेल्या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला. ऑक्साकाच्या जुचिटानमध्ये सर्वाधिक १० जणांना प्राण गमावावे लागले. अजूनही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या शंभर वर्षांत अशा प्रकारचा भूकंपाचा धक्का देशाने अनुभवला नव्हता, असे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निटो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या भूगोल विज्ञान विभागाने भूकंपाची तीव्रता ८.१ रिश्टर असल्याचे म्हटले आहे. १९८५ मध्ये मेक्सिको सिटीला भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात किमान १० हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारच्या भूकंपाचे केंद्र मेक्सिको सिटीपासून ८०० किलोमीटर अंतरावर होते, असे सूत्रांनी सांगितले. 

११ प्रदेशांत हादरे 
भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने मेक्सिकोतील अकरा राज्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. निम्मे मेक्सिको हादरले. सुमारे पाच कोटी लोकसंख्येचा प्रदेश या धक्क्यांच्या टप्प्यात आला होता. 

कार चालवताना कंपने जाणवली 
भूकंपाचा धक्का बसल्यानंतर संपूर्ण शहरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडू लागले. मी त्या वेळी कार चालवत होतो. काय घडले याचा अंदाज घेतला. तेव्हा कारमध्ये बराच वेळ कंपने जाणवत होती, असे २८ वर्षीय क्रिस्टियन रॉड्रिग्ज या उबेर चालकाने सांगितले. 

१० फूट उंच लाटा 
भूकंपाच्याधक्क्यानंतर मेक्सिकोच्या किनारपट्टीवर दहा फुटांच्या लाटा उसळू लागल्या आहेत. मेक्सिकोतील अनेक किनारपट्ट्यांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, अल सॅल्व्हाडर, कोस्टा रिका, निकारागुआ, पनामा, हाँडरस इत्यादी प्रदेशात सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यादरम्यान समुद्र उधाणलेला असेल, असे अमेरिकेच्या हवामान विभागाने स्पष्ट केले. 

‘विजेचे खांब डोलत होते..’ 
भूकंपाच्या धक्क्यानंतरआम्ही घराबाहेर आलो. रस्त्यावरील विजेचे खांब मागे-पुढे होत असताना पाहून आम्ही सर्व घाबरून गेलो होतो. अखेर एका सुरक्षित ठिकाणी आम्हा सर्वांना आश्रय घ्यावा लागला. 
- मायारो ऑर्टिगो, रहिवासी, मेक्सिको सिटी. 
बातम्या आणखी आहेत...