आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद सोडण्यास नकार; भरारा पदावरून निलंबित, ट्रम्प प्रशासनाची कारवाई, 45 अॅटर्नींचे राजीनामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क / वॉशिंग्टन- भ्रष्टाचाराच्या विरोधात धडाडीच्या कार्याबद्दल परिचित असलेल्या भारतवंशीय प्रीत भरारा यांनी सरकारी वकील पदाच्या राजीनाम्यास नकार दिल्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.  

ट्रम्प प्रशासनाने ४८ वर्षीय भरारा यांच्यासह देशातील इतर ४५  सरकारी वकिलांनाही पद सोडण्याचे आदेश दिले होते. माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात भरारा यांची नियुक्ती केली होती. मी राजीनामा दिलेला नाही, परंतु काही क्षणापूर्वी मला पदावरून हटवण्यात आले. अमेरिकेतील अॅटर्नी हा माझ्या कारकीर्दीतील मोठा गौरव होता, असे भरारा यांनी ट्विट करून जाहीर केले.  

गेल्या सात वर्षांपासून देशाच्या सेवेत होतो. माझ्यासाठी खरोखरोच हा गौरवाचा विषय होता. स्वतंत्रपणे न्यायाची बाजू सांभाळताना मला सेवेची संधी मिळाली. न्यायदानाच्या प्रक्रियेला मलाही काही अंशी योगदान देता आले याचा आनंद वाटतो. साऊथ एशियन बार असोसिएशनने भरारा यांच्या निलंबनावर नाराजी व्यक्त केली आहे. 

हाय प्रोफाइल खटले
भरारा यांच्या नावावर अनेक हाय प्रोफाइल खटले लढवले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर परिचित आहे. २०१३ मध्ये भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे यांच्या वादग्रस्त अटकेचे प्रकरणही भरारा यांनी हाताळले होते. त्यामुळे भरारा भारतवंशीय समुदायात परिचित नाव आहे.

ट्रम्प टॉवरवर  घेतली होती भेट  
रिपब्लिकनने गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर भरारा यांनी मॅनहॅटनमधील ट्रम्प टॉवरला जाऊन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली होती. त्यांना नवीन प्रशासनातही कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळावी, अशी विनंती त्यांनी भेटीदरम्यान ट्रम्प यांना केली होती. ट्रम्प यांनीदेखील या भेटीत सकारात्मक संकेत दिले होते. त्यामुळे भरारा यांच्या पदाला काहीही धोका नाही, असा कयास लावला जात होता. परंतु मार्च उजाडताच ट्रम्प प्रशासनाने सर्वांसोबत भरारा यांनाही घरचा मार्ग दाखवला आहे. काही सिनेटरनी ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...