शिकागो - अलविदा अमेरिका. कार्यकाळ संपताना एकच सांगायचे आहे. देशातील लोकशाहीचे संरक्षण करा. तिला वाचवा. कोणत्याच प्रकारच्या भेदभावाला मुळीच थारा देऊ नका, अशी भावनिक साद मावळते राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी नागरिकांना घातली. त्यांच्या भाषणाचा रोख डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता. आेबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या महिन्यात संपणार आहे. त्या निमित्ताने मंगळवारी ते समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
लाडक्या नेत्याच्या समारोपाला सुमारे २० हजार समर्थकांनी हजेरी लावली होती. आेबामा म्हणाले, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्हीच बदल घडवून आणू शकता. हा विश्वास कायम ठेवा.
आपण हे करू शकतो. परंतु जनहो, लोकशाहीवरील संकटाबाबत ही तुम्ही जागृत असले पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण बाह्य आक्रमक विचारांना अजिबात थारा देता कामा नये. अमेरिकेच्या मूल्यांना कदापिही कमकुवत होऊ देऊ नका. त्याचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे. पहिल्या निवडणुकीनंतर अमेरिका कशी असेल, अशी चर्चा सुरू झाली होती. देशाचे ध्येय काय असेल इत्यादी गोष्टीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु ते वास्तव नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणूनच देशात अशा कोणत्याही भेदभाव किंवा आक्रमकतेला स्वीकारू नका. मुस्लिम अमेरिकनांनाबद्दल वेगळी भावना बाळगू नका. आपण जितके राष्ट्रभक्त तितकेच तेही आहेत, ही भावना व्यक्त करा. त्यातून परस्परांत आनंद राहील, असे आेबामा म्हणाले.
आठ वर्षांची कारकीर्द : २० जानेवारी रोजी आेबामा यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतील. आेबामा २००८ मध्ये पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर आले होते. ते अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.
रशिया, चीनला काय जमणार..
जगभरात अमेरिकेचा विशिष्ट प्रभाव आहे. रशिया, चीनसारख्या स्पर्धक राष्ट्रांना हे जमणे शक्य नाही. अमेरिकेने विशिष्ट मूल्यांचा नेहमीच आदर केला, किंबहुना त्यावर ठामपणे उभी राहिली आहे. ही गोष्ट प्रतिस्पर्धी देशांना जमू शकत नाही, असा विश्वास आेबामा यांनी व्यक्त केला.
दहशतवादाच्या विरोधात ठाम
माझ्या कार्यकाळात आम्ही दहशतवादाच्या विरोधात ठामपणे काम केले. म्हणूनच अन्याय दूर करणे शक्य झाले. त्यासाठी निगराणी संदर्भातील कायद्यातदेखील दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळेच मी मुस्लिम अमेरिकन समुदायाच्या विरोधातील भेदभावाला फेटाळून लावले आहे. त्यातूनच आपण दहशतवादाच्या विरोधातील जागतिक लढाईतून बाहेर पडू शकत नाहीत. लोकशाहीची वृद्धी व्हावी, मानवी हक्क, महिला हक्क, एलजीबीटींचे हक्क इत्यादी घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे आेबामा यांनी म्हटले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)