वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या इशार्यानंतरही इराण अणुकरारासंबंधी सिनेटमध्ये मतदान करण्याच्या तयारीने वेग घेतला आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पार्टीचे बहुमत आहे. त्या पक्षाचे नेते मिच मॅक्कोनल यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाविषयीच्या ऐतिहासिक करारावर टीका केली. कराराचा विरोध करणारे खासदार यावर औपचारिक प्रतिक्रिया देण्याची योजना आखत आहेत.
मॅक्कोनल म्हणाले, ओबामा प्रशासनाने काँग्रेस (अमेरिकी संसद) आणि अमेरिकी जनतेला अंतरिम कराराचे वास्तव सांगावे. दहशतवादाचे मुख्य प्रायोजक, इराणवर यातून कसा दबाव टाकला जाईल, हे त्यांना सांगावे लागेल. त्यांनी सिनेटर्स बॉब कॉर्कर आणि बॉब मेनेंडेज यांच्या प्रस्तावित विधेयकाचा आढावा घेण्याचा संकल्प केला आहे.
प्रस्तावात इराणसोबतच्या महत्त्वपूर्ण अणुकराराचा काँग्रेसकडून आढावा घेण्याची तरतूद आहे. यामध्ये खासदारांना आढाव्यासाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना वाटल्यास एवढ्या दिवसांत अणुकरार रद्द करू शकतात. विधेयकात सध्याच्या स्वरूपात दुरुस्ती केल्यास व्हिटोचा वापर केला जाईल, असा इशारा ओबामांनी दिला होता.
सिनेटच्या परराष्ट्र समितीची १४ रोजी बैठक
या विधेयकावर १४ एप्रिल रोजी सिनेट परराष्ट्र समितीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे प्रस्ताव सिनेटमध्ये मतदानासाठी ठेवण्याचा मार्ग मोकळा होईल. ओबामा प्रशासन खासदार आणि काँग्रेसवर दबाव टाकत ३० जूनपर्यंत ओबामांना फ्रीहँड देण्यास सांगत आहे. इराणच्या अणुकराराला अंतिम रूप देण्याची त्या दिवशी डेडलाइन आहे. ओबामा म्हणाले, काँग्रेस करार रद्द करत असेल तर मुत्सद्देगिरीत अपयश आल्याचा आरोप अमेरिकेवर लागेल.