आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयर्लंडनंतर ऑस्ट्रेलियावर समलैंगिक विवाहा करिता दबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - आयर्लंडमधील गे जनमत चाचणीला आठ दिवसही होत नाहीत तोच ऑस्ट्रेलियात देखील समलैंगिक विवाहाला मंजुरी मिळावी यासाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. सोमवारी विरोधी पक्षाकडून संसदेत यासंबंधीचे विधेयक मांडण्यात आले आहे.

लेबर पार्टीचे नेते बिल शॉर्टन यांनी लोकप्रतिनिधी सभागृहात सोमवारी यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. आयर्लंडमधील जनमत चाचणीमुळे मला प्रेरणा मिळाली आहे. आपल्या देशातही हा मुद्दा महत्वाचा वाटतो. कायद्यात दुरूस्ती करून विवाहाच्या व्याख्येत बदल करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरूष असा उल्लेख करण्याऐवजी यापुढे दोन व्यक्ती असा उल्लेख असावा. त्याला वैध ठरवण्यात यावे. आयर्लंड, न्यूझीलंडमध्ये हे जमत असल्यास ते ऑस्ट्रेलियात का घडू शकत नाही? असा सवाल शॉर्टन यांनी केला. जगातील अनेक देशांनी विवाहामध्ये समानता आणणा-या कायद्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया देखील त्यास मान्यता देईल, याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. खरे तर असा कायदा करण्यात कसलाही कमीपणा मानता कामा नये. कारण ऑस्ट्रेलियातील प्रत्येक नागरिकाची मूल्ये आणि विवाह संस्थेबद्दलचा आदर वाढवणारा असेल, असे शॉर्टन यांनी म्हटले आहे.

संख्याबळाचा अभाव
लेबर पार्टीने संसदेत हा प्रस्ताव मांडला असला तरी लोकप्रतिनिधी सभागृहात त्याला मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. परंतु लेबर पार्टीने हा मुद्दा नेहमीच आपल्या पक्षाचा प्रमुख मुद्दा म्हणून मांडला आहे. २००४ पासून लेबर पार्टीने या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार केवळ स्त्री आणि पुरुष यांना विवाह करता येतो.

प्राधान्य नाही : अबोट
विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर गे मॅरेजसंबंंधी दबाव वाढवण्यात येत असला तरी आम्ही त्याचे समर्थन करत नाहीत. हा एक लक्षवेधी मुद्दा आहे. हे मी मान्य करतो; परंतु तो मला महत्त्वाचा आहे, असे वाटत नाही. हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मांडण्यात आला आहे. सरकारचे प्राधान्य अर्थसंकल्पाला आहे. त्यातील त्यासंबंधीच्या गरजांना सरकार प्राधान्य देणार आहे. गे मॅरेजला नव्हे, असे पंतप्रधान टोनी अबोट यांनी सोमवारी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.

२० हून अधिक देशांत परवानगी
समलैंगिक विवाहाला जगभरातील २० हून अधिक देशांत कायद्याने परवानगी मिळालेली आहे. त्यात अमेरिका खंडातील देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील अनेक राज्ये, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ब्राझील, आयलँड, उरुग्वे इत्यादी.

बहिणीचा वेगळा सूर
पंतप्रधान अबोट यांची बहीण ख्रिस्टीन फॉर्स्टर या एका महिलेशी रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी गे मॅरेजला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी पंतप्रधान बंधूंवर आरोपही केला आहे. अबोट वैयक्तिक मते या मुद्द्यावर लादू लागले आहेत.