आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Modi On The Two day Visit To Dubai

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर: अमिरातीशी ऊर्जा, व्यापार सहकार्य वाढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ व १७ ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमिरातीशी ऊर्जा व व्यापारविषयक मुद्यांवर व्यापक चर्चा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले. या दौऱ्यात होणाऱ्या विविध अधिकाऱ्यांच्या बैठकीत भारतात गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाणार आहे.
अमिरातीशी व्यापार भागीदारी असणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथे मोठ्या प्रमाणात भारतीय स्थायिक असून या दौऱ्यादरम्यान मोदी त्यांची भेट घेणार आहेत. १७ ऑगस्ट रोजी मोदी दुबई क्रिकेट मैदानावर भारतीय समुदायाला संबोधित करतील. अमिरातचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांची अबुधाबी येथे मोदी भेट घेणार आहेत. पंतप्रधान शेख मोहंमद बिन राशीद अल मकतुम यांचीही मोदी भेट घेतील.

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी ४८ हजार भारतीय
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी दुबईत ४८ हजार भारतीय नागरिक उपस्थित राहणार आहेत. या स्वागतासाठी खास नोंदणी करण्यात आली असून या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक प्रसार माध्यमांतूनही मोदींचा दौरा व नागरिकांनी केलेल्या नोंदणीला प्रसिद्धी दिली जात आहे.

दरम्यान, संयोजन समितीचे सदस्य बी. आर. शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोदींच्या स्वागतासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंदणी करण्ययात आली आहे. या आंतरराष्ट्रीय मैदानावर ३० हजार नागरिकांची बसण्याची क्षमता आहे. मात्र, त्यापेक्षा कितीतरी अधिक नागरिकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.
अचानक दौऱ्यामुळे संभ्रम
मोदी यांच्या या दौऱ्याची परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या मंगळवारी घोषणा केली. मात्र, कोणतीही परिषद किंवा पूर्वनियोजित बैठक नसताना अचानक घोषित करण्यात आलेल्या या दौऱ्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. याशिवाय अचानक जाहीर झालेल्या या दौऱ्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था, दौऱ्याचे नियोजन आणि इतर तयारीच्या दृष्टीने प्रशासनावरही ताण आला आहे. या दौऱ्यात मोदी गुंतवणुकीबाबत तसेच संरक्षणविषयक काही मोठ्या घोषणा करतील, असे अपेक्षित आहे.