आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी G-4 परिषदेत उचललला सुरक्षा परिषद विस्ताराचा मुद्दा, अनेक देश पाठिशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्रात अद्यापही कित्येक शतके आधी मागे टाकलेली विचारप्रवृत्ती दिसते आहे. दहशतवाद आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने आम्ही विद्यमान दशकात जगत असलेल्या चिंतांचे प्रतिबिंब तिच्यात दिसत नाही. त्यामुळे सुरक्षा परिषदेचा विस्तार निश्चित कालमर्यादेत होणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारण सभेच्या ७० व्या सत्रात त्यावर समाधानकारक तोडगा काढावाच लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) स्थायी सदस्यत्वासाठी दावा करणाऱ्या चार देशांचा गट ‘जी-४’ देशांची परिषद भारताच्या पुढाकाराने झाली. दहशतवाद आणि हवामान बदल, सायबर व अंतराळ संधी व आव्हाने या नव्या आघाड्या आहेत. या आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यूएनएससीत सर्वात मोठी लोकशाही, सर्वात मोठ्या आर्थिक केंद्राचा आवाज सहभागी झाला पाहिजे, असे मोदी म्हणाले.
ब्राझील, जपान आणि जर्मनीनेही मिसळला भारताच्या सुरात सूर
डिल्मा रोसेफ, ब्राझीलच्या राष्ट्रपती
‘सध्या संयुक्त राष्ट्रात १९३ सदस्य राष्ट्रे आहेत आणि सुरक्षा परिषदेचे केवळ १५ सदस्य आहेत. हे प्रमाण योग्य नाही. आम्हाला योग्य प्रतिनिधित्त्व असलेली आणि प्रभावी सुरक्षा परिषद हवी आहे.’

अँजेला मर्केल, जर्मन चान्सलर
‘ जी- ४ हा काही एक्सक्लुझिव्ह गट नाही. अन्य देशांनाही यूएनएससीतील सुधारणांच्या मुद्द्यांवर सोबत घ्यावे लागेल. हेतू साधण्यासाठी आपणाला सहकारी शोधावे लागतील. अन्य देशांशी संवाद कायम ठेवावा लागेल.
शिंजो अॅबे, जपानचे पंतप्रधान : ‘जगासाठी ही ऐतिहासिक संधी आहे. जगात बहुमताचाचा आवाज बुलंद करून त्याचे परिणाम जगाला सांगावे लागतील. आपला एकच संकल्प आहे. तो संकल्प जगाला सांगितला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेतील चर्चेतून ठोस निष्कर्ष हाती येतील.’
जीवन बदलले, यूएन मात्र जैसे थे
यूएनएससीमध्ये सुधारणांसाठी अनेक दशकांपासून चर्चा होत आहे. परंतु त्यात प्रगती झाली नाही. ७० वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेवेळची परिस्थिती वेगळी होती. काळानुसार ती बदलली. सदस्य देशांची संख्या चारपट वाढली आहे. आम्ही डिजिटल युगात राहतो. विकासाच्या नव्या इंजिनामुळे जागतिक अर्थव्यवस्था बदलली आहे. आपले जीवन ग्लोबल झाले; परंतु संयुक्त राष्ट्र होता तसाच राहिला, असे मोदी म्हणाले.
असा आकाराला आला जी- ४ गट
जी- फोर हा भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपान या चार मित्रराष्ट्रांचा एक गट आहे. संयुक्त राष्ट्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी २००४ मध्ये त्याची स्थापना झाली होती. हे चारही देश सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाचे दावेदार आहेत. सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देश मात्र विस्ताराला कायमच जोरदार विरोध करत आलेले आहेत. त्यासाठी त्यांनी काॅफी क्लब स्थापन केला आहे.
धर्म-दहशतवादाची फारकतच हवी
मोदी यांनी न्यूयॉर्क दौऱ्यात अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाबाबत विचारविनियम केला. ते इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतह अल सिसी यांना भेटले. जॉर्डनचे किंग अब्दुल्लांसोबतच्या चर्चेत मोदी म्हणाले की, इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने अवघ्या जगापुढे आव्हान उभे केले आहे. मात्र, दहशतवाद हा धर्मापासून कायम वेगळा ठेवला पाहिजे.