आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासार्हता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत सुधारणा हव्याः पंतप्रधान नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षी संयुक्त राष्ट्रांत हिंदीत भाषण दिले. या वेळी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी हा मुद्दा त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू होता. मोदींनी त्यातही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या दावेदारीचा पुनरुच्चार केला. मोदी म्हणाले, ‘संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले आहे. परस्परांवर अवलंबून आहे. त्यामुळे आमची आंतरराष्ट्रीय भागीदारी संपूर्ण मानवता केंद्रस्थानी ठेवूनच निश्चित करावी लागेल.
विश्वसनीयता आणि औचित्य कायम राखण्यासाठी सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांमध्येही सुधारणा करणे अनिवार्य झाले आहे. व्यापक प्रतिनिधित्व देऊनच आपल्याला ही उद्दिष्टे गाठता येतील.’

संयुक्त राष्ट्रांच्या २०१५ च्या शाश्वत विकासाशी संबंधित उद्दिष्टांवर आपली पाठ थोपटून घेण्याची संधी मोदींनी सोडली नाही. दारिद्र्य निर्मूलन, जन-धन योजना, पेन्शन आणि बँकिंगशी संबंधित योजनांचा उल्लेख त्यांनी केला. मोदी म्हणाले, ‘जो भविष्यकाळ आम्ही कधीही पाहू शकणार नाही त्याबद्दल आम्ही चिंता करायला हवी, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. काही देश आपल्यापासून खूप अंतरावर आहेत असे कारण देऊन आपण त्या देशांसमोरील आव्हानांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यांच्यापासून पळही काढू शकत नाही. जगाच्या कल्याणासाठी तंत्रज्ञान सहकार्य आणि नवोन्मेषी कल्पना ही माध्यमे वापरावी लागतील. विकसित देशांनाही
पुढे येऊन आपली जबाबदारी निश्चित करावी लागेल.’
जीवनशैली बदलावी लागेल
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आपण संयुक्त पण वेगवेगळी जबाबदारी घेऊन हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करतो तेव्हा वैयक्तिक हितांच्या संरक्षणाचा वास येतो. आपल्याला जागतिक लोकसहभाग निश्चित करावा लागेल. सर्वांना स्वच्छ वीज सहजपणे उपलब्ध व्हावी म्हणून तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संपत्ती यांचा वापर करावा लागेल. विजेवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीत बदल करावा लागेल.
मोदींचा वैयक्तिक क्षेत्रावर भर
मोदी म्हणाले, जगात आर्थिक विकासाची चर्चा सार्वजनिक आणि खासगी या दोन क्षेत्रांपर्यंतच मर्यादित राहते. आम्ही वैयक्तिक क्षेत्र या नव्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात सूक्ष्म वित्त पुरवठा, नवोन्मेष, स्टार्ट अपसाठी नवे वातावरण हवे. सर्वांना वीज, घर, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता याला आमचे प्राधान्य राहणार आहे.
हे मुद्देही केले उपस्थित
- गरिबी असेल तर शांततापूर्ण जग, न्यायपूर्ण व्यवस्था आणि शाश्वत विकास शक्यच नाही. दारिद्र्य निर्मूलन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

- भारताने स्वीकारलेला विकासाचा मार्ग आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांत खूपच साम्य आहे.

- गरिबांना शिक्षण मिळावे आणि त्यांच्याकडे कौशल्य असावे, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आर्थिक समावेशकतेचा विडा उचलला आहे.

- आम्ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा मंत्र घरोघरी दिला आहे. स्मार्ट, जिवंत विकास केंद्रे म्हणून शहरांचा विकास केला जात आहे.
स्वातंत्र्योत्तर नेत्यांत मोदी सक्षम : मर्डोक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत घालवलेला वेळ लाखमोलाचा होता. स्वातंत्र्याेत्तर काळातील ते एक सक्षम नेते असून त्यांच्याकडे चांगली धोरणे आहेत, अशा शब्दांत माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी कौतुकोद्गार काढले. मोदी चांगले नेते आहेत; परंतु भारतासारख्या विविधता असलेल्या देशात अजूनही खूप काम करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना ध्येय गाठता येऊ शकेल, असे ८४ वर्षीय मर्डोक यांना वाटते.