आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचा अमेरिका दौरा; बराक ओबामा यांच्याकडून जय्यत तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी सध्या अमेरिकेत जय्यत तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा स्वत: या भेटीच्या तयारीवर लक्ष ठेवून असून त्यांनी उपराष्ट्रपती ज्यो बायडन यांच्यावर बैठकीच्या तयारीची जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि बराक ओबामा यांच्या बैठकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु २८ सप्टेंबरला ही बैठक होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांचे प्रतिनिधी चर्चेसाठी आमने-सामने असतील. लोकसभा निवडणुकीनंतर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्या वेळी आपल्या अमोघ वाणीने पंतप्रधानांनी अमेरिकन जनतेला, औद्योगिक घराण्यांना आपलेसे केले होते.

२८ सप्टेंबरला ओबामा व्यग्र
राष्ट्रपती ओबामा यांच्यासाठी २८ सप्टेंबरचा दिवस सर्वाधिक व्यग्र असणार आहे. त्याच दिवशी संयुक्त राष्ट्राची महासभा असून ओबामा या सभेला संबोधित करतील. दरम्यान, मोदी अमेरिका दौऱ्यात सर्वप्रथम २७ सप्टेंबर रोजी सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाणार आहेत. तेथील सॅप सेंटरमध्ये ते भारतवंशीय अमेरिकन नागरिकांसमोर भाषण देतील.

त्यानंतर ओबामा यांच्या भेटीसाठी न्यूयॉर्कला परत येतील.
१६० इंडो-अमेरिकन संस्था स्वागतासाठी सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीतील समारोहासाठी सुमारे १६० इंडो-अमेरिकन संस्था पुढे आल्या आहेत. या संस्था मोदींच्या स्वागत समारोहाच्या इत्यंभूत तयारीत आघाडीवर आहेत. दरम्यान, आधीच्या अन्य देशांतील पंतप्रधानांच्या कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रमसुद्धा भव्यदिव्य व्हावा, यासाठी भाजप नेते राम माधव अमेरिकेतील समारोह आयोजनाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी या १६० संस्थांच्या सुमारे ४०० प्रतिनिधींची बैठक घेऊन कार्यक्रमाची रुपरेषा आखली आहे.

संयुक्त राष्ट्र अधिवेशनात योगदिनाचा बोलबाला
मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात माेदी यांनी "योगदिन'चा मुद्दा उचलून धरला होता. २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रिय योगदिन साजरा करण्यात आला. मात्र, यंदाच्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नरेंद्र मोदींचे भाषण नसेल. त्यांच्या ऐवजी सुषमा स्वराज भाषण करण्याची शक्यता आहे. मोदी २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रातर्फे चिरंतन विकासावर आयोजित उच्चस्तरीय संमेलनाला संबोधित करतील. याचा अहवाल नंतर संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात ठेवला जाईल. संमेलनात १५० देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील.