आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी इस्रायलने पॅलेस्टाइनला दिल्या सवलती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुसलेम - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी इस्रायलमधील जेरूसलेमला पोहोचले. बेन गुरियन विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष रेवेन रिवलिंग उपस्थित होते.
 
 
नेतन्याहू यांनी, ‘स्वागत, माझ्या चांगल्या मित्रा’या शब्दांत ट्रम्प यांचे स्वागत केले. अध्यक्ष ट्रम्प यांच्या आगमनाच्या काही काळ आधीच इस्रायलच्या मंत्रिमंडळाने पॅलेस्टाइनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजनांना मंजुरी दिली. ट्रम्प हे सौदी अरेबियाची राजधानी रियाधहून येथे आले आहेत.
 
आपल्या दौऱ्याच्या दरम्यान पॅलेस्टाइनबद्दल सौम्य भूमिका दाखवणारी पावले उचलावीत, असे आवाहन ट्रम्प यांनी इस्रायलला केले होते. ट्रम्प मंगळवारी पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना भेटतील. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सतत संघर्ष सुरू आहे आणि ट्रम्प हे तेथे शांतता प्रस्थापित करू शकतात. ट्रम्प यांनी इस्रायलचे अध्यक्ष रेव्हेन रेवलिंग यांची भेट घेतली. रिव्हलिन म्हणाले की, अमेरिका पुन्हा या भूमीत आला हे पाहून आनंद झाला. ट्रम्प म्हणाले की, आता मध्य आशियात हिंसाचार संपुष्टात यावा.
 
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, माझ्या सरकारने अध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त सद्भावना दर्शवणारी पावले उचलली आहेत. त्यामुळे इस्रायलचे कुठलेही नुकसान होणार नाही. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान इस्रायलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे. जुने जेरुसलेम शहर जवळपास बंद आहे.
 
शरीफ यांना भेटून आनंद: ट्रम्प
ट्रम्पयांनी रियाधमध्ये अनेक देशांच्या सरकारप्रमुखांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी उत्साहात हस्तांदोलन केले आणि ‘तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी पाकिस्तानची मदत खूप गरजेची आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात स्थापन झालेल्या ४१ देशांच्या लष्करी आघाडीचा नेता आहे आणि पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ आघाडीचे कमांडर आहेत.
 
पुन्हा ९/११ होऊ नये: इराणचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांच्या रियाध दौऱ्यात इराणच्या विरोधात सुन्नी देशांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता. सौदीसह ५५ देशांनी इराणविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी ट्रम्प यांच्याकडे केली होती. सोमवारी इराणने ट्रम्प यांना, ‘सावध राहा, अमेरिकेत पुन्हा ९/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ नये,’ असा इशारा दिला. इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ म्हणाले कीस २००१ मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ला करणाऱ्या १९ वैमानिकांपैकी १५ जण सौदी अरेबियाचे होते. या दहशतवादी हल्ल्यामागे सौदी अरेबियाचा हात होता, असे ट्रम्प यांनी स्वत: म्हटले होते. आता सौदी अरेबियाशी मैत्री करताना, ते पुन्हा ९/११ सारख्या हल्ल्याला निमंत्रण तर देत नाही ना, याचा ट्रम्प यांनी विचार करावा.
 
इस्रायलने उचललेली प्रमुख पावले अशी
} नैऋत्य किनाऱ्यावर पॅलेस्टाइन औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मदत.
} वायव्य किनाऱ्यावरील जेनिन या शहरापर्यंत इस्रायली रेल्वेचा विस्तार.
} शार एफ्रेम या अतिशय व्यस्त असलेल्या क्रॉसिंग पॉइंटमध्ये येण्या-जाण्यासाठी सुविधाजनक व्यवस्था (तेथून पॅलेस्टिनी मजूर काम करण्यास इस्रायलला येतात.)
} पॅलेस्टाइनला जोडणाऱ्या जॉर्डन नदीवरील पूल २४ तास खुला ठेवणे.
} पश्चिम किनाऱ्यावरील इस्रायल नियंत्रित पॅलेस्टाइन शहरी भागाचा विकास (येथे पॅलेस्टिनींना जमीन खरेदी करण्याची किंवा घर बांधण्याची परवानगी नाही, आता हजारो पॅलेस्टिनींसाठी घरे बांधली जातील.)
बातम्या आणखी आहेत...