आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोत हजारोंची ट्रम्पविरोधात निदर्शने; 20 शहरांत मोठा प्रतिसाद, अाबालवृद्ध सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सिटी - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाच्या विरोधात मेक्सिकोतील हजारो नागरिकांनी रविवारी देशभर निदर्शने केली. ‘मेक्सिकोचा आदर करायलाच पाहिजे,’ अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या.  

मेक्सिकोतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवर महाकाय भिंत बांधली जाईल आणि त्यासाठी मेक्सिकोला निधी द्यावा लागेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या धोरणाला मेक्सिकोत मोठा विरोध होत आहे. डझनभर विद्यापीठे, व्यावसायिक संघटना आणि नागरी संघटनांनी केलेल्या या आंदोलनाच्या आवाहनाला २० शहरांत मोठा प्रतिसाद मिळाला. 
मेक्सिको सिटीत रविवारी २० हजार लोक आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
 
लाल, पांढरा आणि हिरव्या रंगातील मेक्सिकन ध्वजाची जणूकाही लाटच आली होती. ग्वाडालाजारा, माँटेर्री आणि मोरेलिया या तीन शहरांतील आंदोलनाला चांगली उपस्थिती होती. तिजुआना या सीमेवरील शहरात मात्र आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्युलिया रोजास ही महिला निदर्शक म्हणाली की, संपूर्ण देश तुमच्याविरोधात आहे हे ट्रम्प यांना दाखवून देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. रोजास ही मेक्सिकोच्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठाची साहित्य विषयाची विद्यार्थिनी आहे.  

संबंधांत तणाव: ट्रम्प यांनी २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील संबंधांत मोठा तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मोहिमेत मेक्सिकन निर्वासितांना ‘गुंड’ आणि ‘बलात्कारी’ संबोधले होते.
 
‘ही पूल बांधण्याची वेळ, भिंत नव्हे’ 
जोस अँटोनिओ सांचेझ ही ७३ वर्षीय वृद्ध महिला नऊ वर्षांच्या नातीसह मेक्सिको सिटीमधील निदर्शनांत सहभागी झाली होती. ‘ही पूल बांधण्याची वेळ आहे, भिंत बांधण्याची नाही,’ अशी प्रतिक्रिया सांचेझ यांनी नोंदवली. अमेरिकेचे एरिक स्मिथ हेही निदर्शनांत सहभागी झाले होते. त्यांनी एका मेक्सिकन महिलेशी विवाह केला आहे. त्यांच्या हातात ‘सॉरी मेक्सिको’ असे लिहिलेला फलक होता. ‘मला ही भिंत नको, मला आमच्या अध्यक्षांची लाज वाटते हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे,’ असे स्मिथ म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...