आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religion Keep Free From Terrorism Sushama Swaraj

धर्माला दहशतवादापासून मुक्त करा - सुषमा स्वराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनामा - दहशतवाद आणि धर्म यांना समजून घेताना गल्लत होत आहे. त्यामुळेच धर्माला दहशतवादापासून मुक्त केले पाहिजे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बहरिन दौऱ्यात अरब देशांना केले आहे. त्याचबरोबर दहशतवादी गटांना छुप्या पद्धतीने अर्थपुरवठा करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. शांत राहून दहशतवादी गटांना अर्थपुरवठा करता येईल, असे वाटत असणाऱ्यांचा एक भ्रम आहे. अशा गटांना गुप्त पद्धतीने मदत पुरवल्यास त्यांना काही बक्षीस मिळेल, असे त्यांना वाटत असेल. परंतु दहशतवादी गटांचे आपला अजेंडा आहे.
उलट ते यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, याचे भान मदत पुरवणाऱ्यांनी ठेवले पाहिजे, असे स्वराज यांनी सांगितले. त्या अरब राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्री स्तरीय बैठकीत बोलत होत्या. अरब-इंडिया कॉपरेशन फोरमच्या पहिल्या शिखर बैठकीत त्यांनी देशाची दहशतवादावरील भूमिका मांडली. मानवतेवर विश्वास असलेले लोक धर्माला दहशतवादापासून मुक्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. दहशतवादी धर्माचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना हानी पोहोचवू लागले आहेत. दहशतवादी गटांना मानवता समजून घ्यायची नाही. त्या बाबतीत विचार केल्यास भारत हे विविधतेचे आदर्श उदाहरण ठरेल, असे स्वराज म्हणाल्या. येथे त्यांचा दोनदिवसीय दौरा आहे.
बहरिनमध्ये दाखल झाल्यानंतर सुषमा स्वराज यांचे असे स्वागत झाले.

भारत- बहरिन यांच्यात व्यापारवृद्धीवर समझोता झाला आहे. त्याशिवाय दोन्ही देशांनी परस्परांना सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावरही सहमती दर्शवली आहे. सुरक्षा, दहशतवादविरोधी लढाई, व्यापारात उभय देश सहकार्य करतील.
दहशतवादविरोधी सहकार्य वाढीवर भर देण्याची गरज
पठाणकोटमधील हवाई तळावरील हल्ला असो किंवा इंडोनेशियातील स्फोट असतील, या घटनांमुळे दहशतवाद वाढत चालल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच सर्व देशांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात सहकार्य वाढीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. दहशतवादाचा नायनाट करणे हे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्याकडे पूर्वजांनी तयार केलेल्या वास्तूंना दहशतवादी लक्ष्य करू लागले आहेत. त्यामुळे अरब राष्ट्रांतील अनेक जागतिक वारशांना दहशतवादी संघटनांनी नष्ट केले. त्यामुळे आव्हान स्वीकारावे लागेल किंवा वास्तूंवरील हल्ल्याचा धाेका पत्करावा लागणार आहे, असे स्वराज यांनी सांगितले.
सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख
भारतात सर्वधर्मसमभाव आहे. केवळ कायद्याच्या पुस्तकातच नव्हे, तर दैनंदिन जीवनातदेखील सर्वधर्मसमभावाची वागणूक आहे. माझ्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पहाटे अजान, हनुमान मंदिरात पवित्र घंटानाद, गुरुद्वारात गुरू ग्रंथसाहिबचा गोडवा आणि चर्चमधील सुस्वर नित्य ऐकू येतात. अनेकांत एकतेचे तत्त्वज्ञान राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून नव्हे तर त्यापूर्वीपासून चालत आले आहे. ही प्राचीन परंपरा आहे. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान ‘विश्वची माझे घर’ असे मानणारे आणि शिकवणारे आहे.