आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत दंगल; आणीबाणी, बाल्टीमोरमध्ये जाळपोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - गेल्या आठवड्यात अटकेतील कृष्णवर्णीयाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या समुदायाने मंगळवारी बाल्टीमोर शहरात जाळपोळ, लुटालूट केली. त्यात १५ पोलिस जखमी झाले. परिसरात दंगल उसळल्यामुळे प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली असून आठ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
फ्रेडी ग्रे नावाच्या तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर संध्याकाळी बाल्टीमोरमध्ये कृष्णवर्णीय समुदायाने निदर्शने केली. वाहने पेटवून देण्यात आली. लुटालूट केली. त्या वेळी सुरक्षा रक्षकांसोबत निदर्शकांची चकमक उडाली. त्यातून हिंसाचार आणखीनच वाढला. सोमवारी रात्रभर ही धुमश्चक्री सुरू होती. तरुण निदर्शकांनी पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या. त्यामुळे अखेर दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले. शहरातील माँडावमिन मॉलला पेटवून देण्यात आले. निदर्शकांनी केलेले हे कृत्य लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन नाही. हे केवळ गुन्हेगारी कृत्य ठरते, असे पोलिस आयुक्त अँथोनी बॅट्स यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी तरुणावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच जमावातून पोलिसांवर गोळीबार झाला होता. त्या वेळी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावास पांगवावे लागले होते. डेमोक्रॅटिक पार्टीच्या २०१६ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या भावी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी बाल्टीमोर तसेच राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर ग्रेचा मृत्यू शोकांतिका असून त्याचे उत्तर िमळायला हवे, असे म्हटले आहे.

सहा अधिकारी निलंबित
ग्रे या पंचवीसवर्षीय तरुणाचा मृत्यू १९ एप्रिल रोजी उपचारादरम्यान झाला. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने काही दिवस तो रुग्णालयात कोमात होता. त्याच्या एक आठवड्यापूर्वी पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्याच्याजवळ एक चाकू आढळून आला होता. या प्रकरणी सहा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मेरीलँड गव्हर्नरकडून आणीबाणी
बाल्टीमोर हे मेरीलँड राज्यातील एक शहर आहे. गव्हर्नर लॅरी हॉगन यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. जीवित तसेच मालमत्तेच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रे कुटुंबाचा विरोध
शहरात हिंसाचार करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मृत ग्रे याची बहीण फ्रेडरिकाने दिली आहे. आंदोलन असे नको होते.

पोलिसांची कबुली
ग्रेवर उपचार सुरू होते; परंतु त्याकडे पोलिस दलाकडून फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, अशी कबुली पोलिस प्रमुखांनी दिली आहे. दरम्यान संचारबंदी आठ दिवस राहील.
बातम्या आणखी आहेत...