आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाकडून शक्तिप्रदर्शन; पाश्चात्त्य राष्ट्रांचा बहिष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझींवर मिळवलेल्या विजयाला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने रशियाने शनिवारी शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी हजेरी लावली होती. परंतु पाश्चात्त्य देशांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

रशियाने विजय दिनाच्या निमित्ताने शनिवारी मॉस्को शहरात विजयी मिरवणूक काढली. त्यात भारत, चीनसह रशियाच्या लष्कराकडून संचलन करण्यात आले. त्यात किमान १० हजार सैनिकांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, प्रणव मुखर्जी, शी जिनपिंग, की मून यांनी लष्कराची मानवंदना स्वीकारली. वास्तविक दुसऱ्या महायुद्धकाळात अमेरिका आणि रशिया सहकारी देश होते. ब्रिटन, फ्रान्सचाही तत्कालीन मित्रराष्ट्रांत समावेश होता. परंतु यंदाच्या समारंभावर युक्रेनच्या वादाची छाया दिसून आली. त्यामुळेच पाश्चात्त्य देशांनी या कार्यक्रमावर बहिष्काराची भूमिका घेतली.
दरम्यान, ९ मे हा रशियात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने नागरिक एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. लष्करी सैनिकांच्या विधवा तसेच कुटुंबीयांना मदत आणि गौरव केला जातो. विजयी पदयात्रेनंतर मध्य मॉस्कोमध्ये सुमारे २ लाख नागरिकांनी एकत्र येऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

संघर्ष असूनही मेगाइव्हेंट
युक्रेनमधील हस्तक्षेपावरून पाश्चात्त्य देश आणि रशियात संघर्ष सुरू आहे. पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांना पाठिंबा देतानाच क्रिमियाला ताब्यात घेण्यासाठी फूस लावलीे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. तणावातही रशियाने मेगा इव्हेंटप्रमाणे हा
कार्यक्रम आयोजित केला.

रेड स्क्वेअरवर अत्याधुनिक शस्त्रे
विजय दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रेड स्क्वेअरवर अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश हे वैशिष्ट्य ठरले. त्यात अर्माटा टी-१४ आणि अत्याधुनिक लष्करी विमानांनाही सादर करण्यात आले.

कडवा देशाभिमान
दुसऱ्या महायुद्धात रशियाच्या सुमारे २ कोटी ७० लाख सैनिकांनी बलिदान दिले होते. रेड आर्मीच्या विजयाचा देशात नेहमीच कडवा अभिमान बाळगला जातो. त्याचेच प्रतिबिंब शनिवारच्या विजय दिनाच्या कार्यक्रमातून दिसून आले.

२५ शहरांतही पदयात्रा
विजय दिनाच्या निमित्ताने रशियातील छोट्या २५ शहरांतही पदयात्रा आयोजित करण्यात आल्या. त्यात २५ हजारांवर सैनिक सहभागी झाले होते.

या राष्ट्राध्यक्षांचीही होती हजेरी
फत्ताह अल-सिसी (इजिप्त), राैल कॅस्ट्रो (क्युबा), निकोलस मादुरो (व्हेनेझुएला), रॉबर्ट मुगाबे (झिम्बाब्वे), जॅकोब झुमा (दक्षिण आफ्रिका).
बातम्या आणखी आहेत...