मॉस्को/ वॉशिंग्टन - युरोपातील बाल्टिक समुद्रात अमेरिकेच्या लढाऊ जहाजावरून रशियाचे लढाऊ विमान गेल्यामुळे दोन देशांतील तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या या घटनेची निंदा केली आहे. या घटनेमुळे आम्हाला अचानक सराव थांबवावे लागल्याचे अमेरिकेने म्हटले आहे, तर विमान सुरक्षित अंतरावरून गेले होते आणि त्यात कोणतीही शस्त्रे नव्हती, असे स्पष्टीकरण रशियाने दिले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ईगोर कोनाशेंको यांनी गुरुवारी सांगितले की, आमच्या एसयू-२४ या लढाऊ विमानाची चाचणी सुरू होती. तेव्हाच त्यांना अमेरिकेचे जहाज दिसले. मात्र, ते सुरक्षित अंतर ठेवून परतले. त्यावर अमेरिकेने तीव्र संताप करण्याची गरज नसावी.
दरम्यान, अमेरिकेचे ते जहाज बाल्टिक समुद्राच्या रशियन तळाजवळ होते. दुसरीकडे युरोपातील अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, रशियाच्या लढाऊ हेलिकॉप्टरने मंगळवारी ३० फुटांपेक्षाही कमी उंचीवरून अमेरिकेच्या लढाऊ जहाजांची टेहळणी केली तसेच छायाचित्रेही काढली. हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा असल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. पेंटागॉनने हे उडाण आक्रमक असल्याचे म्हटले असून रशियाची ही कारवाई असुरक्षित, गैरव्यवसायिक होती, असे अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्याने म्हटले आहे.
संबंधात तणावाची स्थिती
शीतयुद्धानंतर रशिया आणि पाश्चिमात्य देशांदरम्यान २०१४ मध्ये सर्वाधिक घसरण आली. त्यावेळी रशियाने क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे करत आपल्याकडे खेचून घेतले होते. युक्रेनच्या पूर्वाेत्तर भागात फुटिरतावाद्यांना पाठिंबा देत असल्याचे आरोपही रशियावर होत असतात.