आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत भाषा लोकमानसाला शुद्ध करणारी, संस्कृत परिषदेत सुषमा यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - संस्कृत आधुनिक आणि वैश्विक भाषा असून ती गंगा नदीसारखी पवित्र आहे. त्यामुळे संस्कृतचा प्रसार व्हायला हवा. संस्कृत जगभरातील लोकमानसाचे शुद्धीकरण करेल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला आहे.

पाचदिवसीय १६ व्या आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वराज बोलत होत्या. जगभरातील ६० देशांतील ६०० विद्वान परिषदेत सहभागी झाले आहेत. रविवारी परिषदेला सुरुवात झाली. गोमुख असो की गंगासागर. गंगा नदी सर्वत्र पवित्र आहे. कोणत्याही रूपात ती शुद्ध असते. अगदी तसेच संस्कृतचे आहे. संस्कृतच्या संपर्कात येणारा पवित्र होतो. म्हणूनच संस्कृतचा प्रसार झाला पाहिजे. लोकमनाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता या भाषेत आहे. आधुनिक काळात संस्कृतचे माहात्म्य संशोधकांनी मान्य केले आहे. सॉफ्टवेअर भाषेची आेळख, भाषांतर, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्ध्यांक इत्यादी क्षेत्रात संस्कृतचा प्रभावी उपयोग होतो, असे संशोधकांना वाटू लागले आहे. संस्कृतमधील ज्ञानातून सध्याच्या अनेक समस्यांची सोडवणूक करता येऊ शकते. त्यात नागरीकरणातील संघर्ष, गरिबी, दहशतवाद, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांचे निराकरणही शक्य आहे. लोकांमधील भेदभाव हा संकुचित प्रवृत्तीला दर्शवणारा असतो. वास्तविक खुल्या विचारांचे लोक संपूर्ण जग आपले आहे, असाच विचार करतात.परिषदेतील विद्वानांनी नवे जग आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, २ जुलै रोजी परिषदेचा समारोप होईल. समारोपाला शिक्षणमंत्री स्मृती इराणी हजेरी लावतील.

‘अॅक्ट ईस्ट’ धोरणानुसार थायलंड महत्त्वाचा भागीदार
भारतासाठी अॅक्ट ईस्टचे धोरण महत्त्वाचे आहे. त्यात थायलंड महत्त्वपूर्ण भागीदार आहे, सामरिक आणि आर्थिक पातळीवर आग्नेय आशियातील हे संबंध महत्त्वाचे आहेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय संबंधांबरोबरच सांस्कृतिक, धार्मिक आणि शेजारी देश अशा क्षेत्रात दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. जमिनीवरून म्यानमारमार्गे थायलंडशी असलेला संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. आता सागरी क्षेत्रातूनही थायलंडशी संपर्क ठेवला जाईल.

भाषण संस्कृतमधूनच
सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या उद्घाटनाचे संपूर्ण भाषण संस्कृतमधूनच केले. यापूर्वी मंत्रिपदाची शपथदेखील त्यांनी संस्कृतमधून घेतली होती.
भारतातून २५०
संस्कृत परिषदेत भारतातून २५० विद्वान सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३० राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्कृत भारतीचे सदस्य आहेत.

टिप्सही दिल्या
- संस्कृतचे अध्यापन आकर्षक असावे.
- अध्यापनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे.
- संशोधनात संस्कृतचा वापर व्हायला हवा.
- आधुनिक विषयांशी संस्कृतला जोडावे. जावे.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय भाषिक संपर्क मंडळाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृत भाषेच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्यांना २० हजार डॉलर्स आणि प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती स्वराज यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...