आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियाला कोरा चेक नाही; अमेरिकेने फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - येमेनमध्ये सौदीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हल्ल्यात शनिवारी १४० जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अमेरिकेने सौदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सौदीला कोरा धनादेश देण्यात आलेला नाही. आम्ही दहशतवादविरोधी मोहिमेत दिलेल्या पाठिंब्याचा आढावा घेऊ, असे अमेरिकेने रविवारी स्पष्ट केले आहे.
सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य म्हणजे अमेरिकेने सौदीला दिलेला कोरा चेक नाही. प्रादेशिक सुरक्षेसाठी आम्ही सौदीला मदत करत आलो आहोत, परंतु त्या सहकार्याचा चुकीचा अर्थ काढता येणार नाही. वास्तविक येमेनमधील संघर्षावर आम्ही नेहमीच चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी अंत्यसंस्काराच्या वेळी एकत्र आलेल्या लोकांवर हल्ला झाला. त्यात १४० जणांचा मृत्यू, तर ५०० जखमी झाले. त्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय पातळीवर पाठिंब्याचा तातडीने आढावा घेणार आहोत, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे. दरम्यान, सौदीच्या नेतृत्वाखालील हवाई हल्ल्यात आतापर्यंत नागरिकांचा बळी गेला आहे. ही संख्या सुमारे ६ हजार ७०० एवढी आहे, असा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे.
हल्ल्याचा स्वतंत्र तपास
करा : बान की मून
सौदीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याच्या घटनेचा स्वतंत्र तपास करण्यात यावा. हल्लेखोरांना शासन झालेच पाहिजे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले आहे. अंत्यसंस्काराच्या हॉलवर हल्ला झाला होता. त्यात १४० जणांचा मृत्यू झाला. येमेनमधील बंडखोरांच्या विरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली आघाडी हवाई कारवाई सुरू आहे. हा हल्ला अतिशय वेदनादायी व खेदजनक आहे, असे मून यांनी म्हटले आहे.
शांततेसाठी प्रयत्न : अमेरिकेने एप्रिलमध्ये सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी, येमेनचे सरकार, बंडखोर हौथी, सालेह यांच्या फौजांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व गटांनी जनतेसमोर आले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत, असे प्राईस यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...