दुबई - येमेन येथे हौती बंडखोरांविरुद्ध सौदी अरबने वायू हल्ल्यांची मोहीम तीव्र केली असून यासाठी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात येत आहे. क्लस्टर बॉम्बचे दूरगामी परिणाम वातावरणावर होतात. तसेच यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यताही असते. या स्फोटकांचा अनेकदा तत्काळ स्फोट होत नाही. मात्र, यामुळे विषारी वायूची निर्मिती होऊ शकते. क्लस्टर बाॅम्बचा वापर म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याचे मत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने व्यक्त केले. सौदीने या बॉम्बचा वापर करू नये, असा इशाराही देण्यात आला. या बॉम्बचा पुरवठा अमेरिकेकडून केला जात आहे.
दरम्यान केवळ हल्ल्याचे लक्ष्य स्पष्ट असल्यावरच क्लस्टर बॉम्ब वापरावेत, गंभीर परिस्थितीशी झुंजण्यासाठी याची निर्मिती करण्यात आल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले आहे. याच पूर्वअटीवर सौदीला क्लस्टर बॉम्बचा पुरवठा केल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान संघटनेने क्लस्टर बॉम्ब हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे छायाचित्र प्रसारित केले आहे. २००८ मध्ये ११६ देशांनी यांचा वापराविरोधी करार केला होता.