आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री मोहंमद नायेफ यांच्याकडे युवराजपद, सौदी अरेबियाच्या युवराजाचे पद काढण्याचे फर्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - सौदी अरबच्या किंग सलमान यांनी युवराज मॉगरेन बिन अब्दुल अजीज बिन सौद यांचे पद काढून घेण्याचे फर्मान दिले. हे पद विद्यमान गृहमंत्री मोहंमद बिन नायेफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. सौदी प्रेस एजन्सीने रॉयल कोर्टाचा हा निर्णय प्रसिद्ध केला. मॉगरेन बिन यांचे उपपंतप्रधानपददेखील संपुष्टात आले आहे. मोहंमद बिन नायेफ यांना युवराजपद, उपपंतप्रधानपद तसेच गृहमंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. नायेफ हे राजकीय आणि संरक्षण कौन्सिलचेही प्रमुख राहतील, असा निर्णय रॉयल कोर्टाने दिला आहे. मॉगरेन यांना युवराजपदावरून मुक्त करण्यात आले असले तरीही त्यांच्या शाही इतमामात कोणतीही घट केली जाणार नाही, असे किंग सलमान यांनी स्पष्ट केले.

पूर्वीचे बादशहा अब्दुल्ला यांच्या कार्यकाळातील मॉगरेन हे एकमेव उच्चाधिकारी होते. या शेवटच्या उच्चपदस्थालाही किंग सलमान यांनी पदमुक्त केले. २३ जानेवारी रोजी किंग अब्दुल्ला यांच्या मृत्यूनंतर किंग सलमान यांच्याकडे राजेपद आले होते. सौदी राजसत्तेचे संस्थापक अब्दुल अझिज बिन सौद यांचे ६९ वर्षीय मॉगरेन हे सर्वात धाकटे पुत्र आहेत. नायेफ हे त्यांचे नातू असून ते जगातील सर्वात आघाडीच्या तेल निर्यातदारांपैकी आहेत. दरम्यान, अलीकडेच सौदी अरेबियाने येमेनमध्ये हस्तक्षेप करून हवाई हल्ले केले. सौदीच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या कारवाईला इराणने विरोध केला.
नायेफ यांची कारकीर्द
सौदीमधून अल-कायदा या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे उखडून काढण्यात ५५ वर्षीय मो. नायेफ यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अब्दुल अजीज यांच्या तिसऱ्या पिढीला नायेफ यांच्या रूपाने प्रथमच राजकीय जीवनात संधी मिळत आहे. येमेनी बंडखोरांविरुद्धच्या कारवाईत नायेफ यांची महत्त्वाची भूमिका आहे. किंग सलमान यांचे पुत्र प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांना उपयुवराजपद देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...