आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेनमध्ये सौदी हल्ले बंद; बंडखोरांचा पवित्रा कायम, नवी मोहीम हाती घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अदन/रियाध - येमेनमध्ये मागील काही दिवसांपासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वात हाउती बंडखोरांविरोधात सुरू असलेले "ऑपरेशन डिसायसिव्ह स्टॉर्म' मंगळवारी मध्यरात्री अखेर थांबवण्यात आले. या अभियानांतर्गत सौदी अरेबिया तसेच अन्य १० राष्ट्रांनी हाउती बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवले होते.

सौदीच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, येमेनचे राष्ट्रपती अब्द रब्बो मन्सूर हादी यांच्या विनंतीवरून हे अभियान थांबवण्यात आले आहे. मात्र, त्याच्या जागी आता एक दुसरे नवे अभियान हाती घेतले जाणार आहे. त्यास "ऑपरेशन रिस्टोअरिंग होप' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, सरकारकडून हवाई हल्ले थांबवण्यात आले असले तरी बंडखाेरांकडून मात्र तीच स्थिती कायम आहे. बंडखोरांनी हल्ले सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी हल्ल्याच्या तिस-या दिवशी येमेनमधील तिन्ही शहरांमध्ये संघर्षाची स्थिती कायम होती. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

अमेरिकेकडून मदत कायम
सौदी हल्ले बंद करण्याच्या निर्णयाचे अमेरिकेच्या व्हाइट हाउसकडून स्वागत करण्यात आले आहे. येमेनमध्ये संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असलेली राजकीय प्रक्रिया बहाल करण्यासाठी अमेरिका कायम मदत करत राहील, असे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इराणवर टीका केली आहे. येमेनमध्ये शस्त्रात्रांचा पुरवठा करण्यात येऊ नये, असा इशारा आपण इराणला आधीच दिला होता, असे ओबामा यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्या इशा-याकडे कानाडोळा करत इराणने शस्त्रास्त्रांनी भरलेले जहाज येमेनकडे पाठवले होते.

नागरिकांचे संरक्षण हेच उद्दिष्ट
बंडखोर व सरकारच्या संघर्षात सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे संरक्षण व्हावे तसेच येमेनमधील दहशतवादाविरोधातील लढाई सुरू राहावी, यासाठी नवे अभियान हाती घेण्यात आले आहे. आघाडीच्या लष्कराने येमेनमधील इराण समर्थक हाउती बंडखोरांच्या विरोधात महिनाभर हवाई हल्ले केले. मंगळवारी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ३० लोकांचा मृत्यू झाला. यात अनेक नागरिकांचा समावेश होता. जानेवारीत माजी राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या पाठिंब्यातील लष्कराच्या मदतीने हाउती बंडखोरांनी राजधानी सनावर ताबा चढवला होता. तेव्हापासून देशातील संघर्षपूर्ण स्थिती कायम आहे.