वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटचा दुसऱ्या क्रमांकाच्या दहशतवाद्याला ठार मारण्यात अमेरिकेच्या नेतृत्वातील जवानांना यश आले आहे. व्हाइट हाऊसमध्ये नॅशनल सेक्युरिटी कौंसिलचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी इराकच्या मोसूलमध्ये फाधील अहमद अल-हयाली एका हल्ल्यात मारला गेला. हयाली हा ISIS मध्ये अबू बकर अल बगदादी याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता.
गेल्यावर्षी उन्हाळ्यामध्ये इराकचे मुख्य शहर मोसूलवर ताबा मिळवण्यासाठी ISIS ने केलेल्या हल्ल्यात तो सहभागी होता. तो इराक आणि सिरियाच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये शस्त्रे आणि स्फोटके पोहोचवण्याचे काम करत होता. आयएसआयएसच्या फायनान्स, मिडिया आणि मिलिट्री ऑपरेशन्सचे तो काम सांभाळत होता, अशी माहितीही व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या माहितीनुसार हयाली इराकमधील अमेरिकेच्या डिटेन्शन सेंटर कँप बुकामध्येही राहिला होता. अनेक वर्षांपूर्वी बगदादीलाही येथे ठेवण्यात आले होते. हयाली त्यापूर्वी सद्दाम हुसेनच्या स्पेशल फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल होता. त्याचे नाव अल-कायदाशीही जोडले गेले आहे.