आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेज यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल अविव - नोबेल पुरस्कार विजेते तथा इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेज यांचे बुधवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यातील अनेक वर्षांचा संघर्ष मिटवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना शांततेचा नोबेल मिळाला होता.
पेरेज यांनी दोन वेळा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. पुढे ते देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष झाले. गेल्या काही वर्षांपासून ते शारीरिक व्याधीने त्रस्त होते. त्यातच मंगळवारी मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर तेल अविवमधील शेबो मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारात त्यांचा मृत्यू झाला. शिमॉन पेरेज हे द्रष्टे आणि इस्रायलचे खरे संरक्षक नेते होते. आपल्या नागरिकांच्या उत्थानासाठी त्यांनी सगळे आयुष्य खर्ची घातले होते, अशा शब्दांत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेतान्याहू हे पेरेज यांचे राजकीय विरोधक म्हणून परिचित आहेत. पेरेज यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्यासह जगभरातील बडे नेते सहभागी हाेणार आहेत.
एखाद्यावर जिवापाड प्रेम करावे असे शिमॉन माझे आदर्श होते, असे ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी म्हटले आहेत.

सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाला पाठिंबा
शिमॉन पेरेज भारताचे जबरदस्त चाहते होते. पृथ्वीवरील सर्वात महान लोकशाही अशा शब्दांत त्यांनी भारताचा गुणगौरव केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी संयुक्त राष्ट्रात भारताच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वाचे जाहीरपणे समर्थन केले होते.
प्रकाश दूर निघून गेला..
मानवी इतिहासबदलणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये शिमॉन यांचे नाव घ्यावे लागेल. ते माझे चांगले मित्र होते. शिमॉन यांच्या निधनामुळे प्रकाश जणू दूर निघून गेला आहे. परंतु त्यांची शिकवण आपल्यासाठी सदोदित पथदर्शी ठरणार आहे.
-बराक आेबामा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका.

सत्तर वर्षांची कारकीर्द
शिमॉनपेरेज यांची राजकीय कारकीर्द अत्यंत मोठी राहिली आहे. सात दशके ते देशाच्या राजकीय पटलावर लीलया वावरले. त्यावरून सामान्य नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिमॉन यांची राजकीय उंची लक्षात येऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधीपासून परराष्ट्र ते अर्थ खात्याच्या मंत्रिपदापर्यंत त्यांनी सर्व पदांचा अनुभव घेतला. नंतर ते पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचले. पोलंडमध्ये १९२३ मध्ये जन्मलेले शिमॉन १९३२ मध्ये ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील पॅलेस्टाइनला दाखल झाले. १९५९ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. डाव्या विचारांच्या मापाई पार्टीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. पुढे ते मॉडर्न लेबर पार्टीचे अग्रणी राहिले. सार्वजनिक पदांवर सर्वाधिक काळ राहणारे ते एकमेव नेते आहेत. ‘इस्रायलचा इतिहास म्हणजे शिमॉन यांचा इतिहास आहे,’ अशा सार्थ शब्दांत ‘जेरुसलेम पोस्ट’ने त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले.
बातम्या आणखी आहेत...