आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसमध्ये मुंबईसारखा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, 127 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर पॅरिसमध्ये दहशतीचे वातावरण आहे. - Divya Marathi
स्फोटानंतर पॅरिसमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पॅरिस- जगाची फॅशन व ग्लॅमरची राजधानी आणि आपल्या रंगेलपणासाठी प्रसिद्ध पॅरिसची सायंकाळ शुक्रवारी (आपल्याकडे शनिवारी पहाटे) रक्ताने माखली. रायफली आणि आत्मघाती बेल्टद्वारे आयएसच्या ८ अतिरेक्यांनी एकाच वेळी ६ ठिकाणी हल्ले केले. लोकांना बंधक बनवले. अगदी २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखेच.

या नृशंस हल्ल्यात १२७ जण ठार, तर १८० पेक्षा जास्त जखमी झाले. गोळ्या संपल्यानंतर कोणीही जिवंत वाचू नये म्हणून अतिरेक्यांनी पळणाऱ्या लोकांवर स्फोटकांनी भरलेले जॅकेट फेकले. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. १९४४ नंतर पहिल्यांदाच फ्रान्समध्ये संचारबंदी लागू झाली आहे. आपत्कालीन बैठकीनंतर अध्यक्ष ओलांद यांनी तीन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केली. त्याचबरोबर हे देशाच्या विरोधातील युद्ध आहे, असा उल्लेख केला. ओलांद म्हणाले, अतिरेक्यांनी जसा निर्दयीपणा दाखवला, आम्हीही त्यांच्याविरोधात तेवढेच निर्दयी होऊन कारवाई करू. जगाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
मारत होते व म्हणत होते-सिरियाचा बदला घेतला बेंजामिन केजेनोवेसने सोशल मीडियात लिहिले-‘बाटाक्लानमध्ये रॉक कन्सर्टमध्ये अतिरेक्यांनी ज्यांना बंधक बनवले त्यात मीही होतो. पहिल्या मजल्यावर सव्वाशे लोकांना बंधक बनवले होते. अतिरेकी सर्वांना एक-एक करून मारत होते. सिरियाचा बदला घेतला, असे ते वारंवार म्हणत होते.’

त्यांनी मृत व्यक्तींनाही गोळ्या घातल्या
कन्सर्ट हॉलमध्ये उपस्थित फ्रान्स रेडिओची वार्ताहर ज्युलियन पेरसेने सांगितले-‘अतिरेकी काळ्या कपड्यांत होते. हॉलमध्ये घुसताच त्यांनी गोळीबार सुरू केला. तब्बल १५ मिनिटे गोळीबार सुरू होता. बचावासाठी लोक मृतदेहांजवळ पडले, पण अतिरेक्यांनी मृतांवर, जखमींच्या डोक्यांत गोळ्या घातल्या.
फ्रान्सवरच वारंवार हल्ले का?
या वर्षी ६ व्यांदा झाला हल्ला पहिले कारण : सिरिया व इराकमध्ये फ्रान्स अमेरिकन फौजांना सहकार्य करत आहे. त्यामुळे आयएस लक्ष्य करत आहे. फ्रान्सने विदेशी जिहादींशी लढण्यासाठी १० हजार सैनिक पाठवले आहेत.

दुसरे कारण : युरोपीय देशांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम राहतात. आयएसला येथे स्लीपर सेल बनवणे सहज शक्य झाले. गोपनीय अहवालानुसार, सध्या फ्रान्समध्ये ७०० हून जास्त स्लीपर सेल आहेत.

तिसरे कारण : युरोपच्या अनेक देशांची सीमा फ्रान्सला लागून आहे. या देशांतील मोठ्या भागावर अतिरेक्यांनी चार-पाच वर्षांपासून कब्जा केला आहे. तेथून शस्त्रास्त्रांचा सहज पुरवठा होतो.

चौथे कारण : फ्रान्सने मालेत अल कायदाच्या विरोधात २०१३ मध्ये अाघाडी उघडली होती. तेथे त्यांचा मुकाबला अल कायदाच्या इस्लामिक मगरीब या कमजोर गटाशी होता. १५ दिवसांपूर्वीच त्याच्या नेत्याने फ्रान्सवर हल्ल्याची धमकी दिली होती.

पाचवे कारण : आयएसच्या विरोधातील लढाईसाठी इराकमध्ये विमाने पाठवू, असे अध्यक्ष ओलांद यांनी घोषित केले होते.

दरम्यान, भारताने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या संकटसमयी भारत फ्रान्सवासियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

असे झाले हल्ले :
>पहिला हल्ला : नॅशनल स्टेडियम : ४ जणांचा मृत्यू, दहशतवादी आत घुसू शकले नाहीत. त्यांनी स्टेडियमबाहेर तीन स्फोट केले. स्टेडियममध्ये जर्मनी व फ्रान्स संघांचा फुटबॉल सामना सुरू होता व तो पाहण्यासाठी राष्ट्रपती ओलांद हेदेखील उपस्थित होते.

>दुसरा हल्ला : ली कॅरिलोन बार : १८ जणांचा मृत्यू, २३ जण जखमी

>तिसरा हल्ला : ली कंबोज रेस्टॉरंट : १४ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

>चौथा : डी ला रिपब्लिका : ४ जणांचा मृत्यू, २१ जण जखमी

>पाचवा : बाटाक्लॉन सांस्कृतिक सभागृह : ८० जणांचा मृत्यू, येथे रॉक शो सुरू होता. दीड हजार लोक उपस्थित होते. चार दहशतवाद्यांनी सर्वांना ओलीस ठेवले व अंदाधुंद गोळीबार केला. नंतर तिघांनी स्वत:ला उडवले. एकाला पोलिसांनी ठार मारले.
>सहावा : रू - ब्यूमार्चिस : ७ जणांचा मृत्यू, ३ जखमी.

ओबामा - मोदींकडून निषेध
>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, फ्रान्सच्या लोकांवर नाही तर मानवतेवर हल्ला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
>> ब्रिटन दौऱ्यावर असेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
>> ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी हल्ल्याचा निषेध करत, इंग्लंड शक्य ती सर्व मदत करेल असे म्हटले आहे.
UPDATES
>> भारतात दिल्ली - मुंबई सारख्या मोठ्या शहरांना सतर्कतेचा इशारा. सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली.
>> रॉयटर्सचे वृत्त - पॅरिस हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली.
>> बेल्जियमने फ्रान्समधील हल्ल्यानंतर आपल्या सीमेवर सुरक्षा चोख केली.
>> फेसबुकने पॅरिस हल्ल्यानंतर सेफ्टी चेक टुल अॅक्टिव्ह केले.
>> फ्रेंच मीडियाचे वृत्त - पॅरिस हल्ल्याची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना ISIS ने घेतली.
>> तपास यंत्रणांचा दावा - आतापर्यंत आठ दहशतवादी मारले गेले.
>> फ्रान्समधील भारतीय दुतावासाचे अधिकारी मनीष प्रभात यांनी सांगितले, की हल्ल्यात भारतीय जखमी झाल्याची माहिती नाही.
>> पोलिसांचा दावा सर्व हल्लेखोर मारले गेले. पाच जणांचे मृतदेह सापडले.
>> भारतीय दुतावासाने सुरु केला हेल्पलाइन क्रमांक - 0140507070.
>> भारत सरकार म्हणाले - आम्हाला आशा आहे की पॅरिसमधील सर्व भारतीय सुरक्षीत असतील. या संकटसमयी आम्ही फ्रान्ससोबत.
>> पोलिसांचा दावा - दहशतवाद्यांनी क्लाशिनकोव्ह एके-47 आणि मशीनगन मधून फायरिंग केले.
>> पॅरिसमध्ये मिलिटरीला पाचारण करण्यात आले. 1500 सैनिक तैनात.
>> फ्रान्सने देशाच्या सीमा सील केल्या.

आयएसआयएसच्या निशाण्यावर फ्रान्स
काही महिन्यांपूर्वी फ्रान्समधील वृत्तपत्र आणि कोशर ग्रोसरीवर आयएसआयएसकडून हल्ला झाला होता. यात 20 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी चार्ली हेब्दो या व्यंगचित्र नियतकालिकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 13 पत्रकार मारले गेले होते.
फ्रान्समध्ये केव्हा - केव्हा हल्ले
>> जून 2015 - सेंट क्वेंटिन फॅलेव्हर येथील गॅस कंपनीत हल्ला. दहशतवाद्यांनी एका व्यक्तीचे शीर कलम केले होते.
>> जानेवारी 2015 - इस्लामवरील एका व्यंगचित्राच्या विरोधात प्रसिद्ध नियतकालिक चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हल्ल्यानंतरची पॅरिसमधील दहशत..