आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी रोखले, बंधाऱ्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - सिंंधूसह इतर नद्यांचे पाणी वाटप रोखण्याचा इशारा भारताने देताच पाकिस्तानशी सलगी करणाऱ्या चीनने ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी रोखण्याची कुरापत केली आहे. तिबेटमध्ये नदीवर जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून त्यासाठी हा उपद्व्याप करण्यात आला आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहावर परिणामाची भीती व्यक्त झाली आहे.

शियाबुकू नदीवर लाल्हो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. तिबेटमधील शिगाझेमध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. चीनने हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी ७४० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. देशाचा हा सर्वात महागडा प्रकल्प आहे. चीनच्या १३ व्या पंचवार्षिक योजनेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू झाले होते. त्याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. चीनच्या या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर नेमका काय परिणाम होईल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. ब्रह्मपुत्रेचा प्रवाह भारत,बांगलादेशकडे वाहतो. भारताने गेल्या वर्षी चीनकडे या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली.

सिक्कीमपासून जवळ : तिबेटमधील शिगाझे येथे हा प्रकल्प होणार आहे. शिगाझेला शिगात्से म्हणूनही आेळखले जाते. हा प्रदेश सिक्कीमपासून जवळ आहे. ब्रह्मपुत्रेचा प्रवाह त्या भागातून अरुणाचल प्रदेशकडे वाहतो. बंधारा व प्रकल्पामुळे हा प्रवाह खंडित होण्याचीही भीती आहे.
संसदेकडून भारताचे समर्थन : अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटिक पार्टीचे व्हिप स्टेनी होयर यांनी उरी दहशतवादी हल्ला मनाचा थरकाप उडवणारी घटना होती, असे म्हटले आहे. संसदेच्या ऊर्जा व वीज समितीचे उपाध्यक्ष पेटे आेल्सन म्हणाले, भारत सातत्याने दहशतवादाच्या विरोधात लढत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे समर्थन करतो.

अण्वस्त्राच्या भाषेवर अमेरिकेची नाराजी
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध अण्वस्त्राची भाषा केली होती. त्यावर अमेरिकेने शनिवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही अण्वस्त्राच्या बाबतीत वारंवार आक्षेप नोंदवला होता. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे, असे परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा अासिफ यांनी दोन वेळा अण्वस्त्र डागण्याची भाषा केली होती. भारताने युद्ध लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही भारताला नष्ट करू.
भारत-पाक वाटाघाटींसाठी मध्यस्थीची ऑफर
संयुक्त राष्ट्र - भारत-पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी मध्यस्थीची ऑफर दिली आहे. दोन्ही देशांची तयारी असल्यास मध्यस्थी करण्यास तयार आहे, जेणेकरून प्रादेशिक पातळीवरील तणाव निवळण्यास मदत होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...