आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही शोमधून शिकलेल्या कौशल्याने वाचवला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातातून बचावलेली ऑटम - Divya Marathi
अपघातातून बचावलेली ऑटम
वॉशिंग्टन - अमेरिकेत १६ वर्षांची तरुणी ऑटम विएट्चने धैर्य आणि बुद्धिकौशल्याचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. ऑटम िवमान दुर्घटनेत बेपत्ता झाली होती. बचाव पथकही तिला शोधू शकले नव्हते. मात्र, टीव्ही कार्यक्रमात दाखवलेल्या प्राण वाचवण्याच्या तंत्रातून (सर्व्हायव्हल टेक्निक) तिने स्वत: बचाव पथकाशी संपर्क साधला.
ऑटमचे वडील डेव्हिड यांच्या माहितीनुसार, ऑटम शनिवारी आजी-आजोबासोबत मोंटानाहून वॉशिंग्टनला जात होती. तिघे विमानाने रवाना झाले. एका तासानंतर वॉशिंग्टनला पोहोचणार होते, मात्र अपेक्षित वेळेत घरी न पोहोचल्याने डेव्हिड यांनी बचाव पथकाकडे मदत मागितली. यानंतर बचाव व मदत पथकाने संभाव्य दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, हाती काहीच लागले नाही.
सोमवारी सायंकाळी वॉशिंग्टनहून साधारण दीडशे किमी अंतरावर मुलगी जिवंत असल्याची बातमी कानी पडली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ऑटमने सांगितले की, आम्ही दाट ढगांतून जात होतो. ढग संपल्यानंतर समोर पर्वत दिसला. आजोबा विमानाला वळवू शकले नाहीत, त्यामुळे विमान धडकले आणि त्याला आग लागली. विमानाबाहेर पडून आजी-आजोबांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,परंतु तेवढ्यात स्फोट झाला. मी तिथे बसून रडू लागले. जवळपास एक तास मदतीची प्रतीक्षा केली. मदत धूसर दिसू लागताच मी चालायला सुरुवात केली. पापा नेहमी सर्व्हायव्हल आणि साहसी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोत्साहन देत होते. मला काही कार्यक्रमांतील सर्व्हायव्हल टेक्निक आठवले. मदतीसाठी वाट पाहत मरण्यापेक्षा मी पर्वत व वन क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. झाडांच्या संख्येवरून आसपासच्या लोकसंख्येचा अंदाज घेतला. चालत-चालत सोमवारी दुपारी वॉशिंग्टनहून १४० किमी दूर महामार्ग-२० वर आले. तिथे एका कार चालकाकडे लिफ्ट मागितली. स्वत:वर ओढवलेला प्रसंग सांगितला तेव्हा त्याने माजमा गावातील एका स्टोअरपर्यंत पोहोचवले. स्टोअरमधील लोकांनी मदत पथकाला बोलावले आणि मला रुग्णालयात दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...