आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव कमी करण्यासाठी दक्षिण कोरियाचा द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तर कोरियाच्या लष्करी आक्रमकतेमुळे क्षेत्रीय तणाव वाढत आहे. यात शस्त्रस्पर्धा करणे मान्य नसल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. उ. कोरियाने द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव मान्य करावा, अशी भूमिका द. कोरियाने घेतली आहे. प्याँगयांगने आपल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतर द. कोरियाने आता द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव दिलाय. 

मून जाए इन यांनी सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर तत्काळ उ. कोरियाला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र अमेरिकी हस्तक्षेपानंतर त्यांनी याचा पाठपुरावा केला नाही. आता पुन्हा मून यांनी द्विपक्षीय चर्चेचा मुद्दा उचलून धरला आहे. मून जाए इन हे शांततावादी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी म्हटले की,  १९५०-५३ दरम्यान झालेल्या कोरियन युद्धानंतर दोन्ही देशांत दरी निर्माण झाली. आता ती मिटवण्याची गरज आहे.  

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने येत्या शुक्रवारी द्विपक्षीय चर्चा व्हावी असा प्रस्ताव दिला आहे. सीमेवरील पानमुंजोम गावात ही द्विपक्षीय बैठक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र रेडक्रॉसने याच गावात १ ऑगस्ट रोजी बैठक घ्यावी, असे म्हटले आहे.  

डिसेंबर २०१५ मध्ये झाली होती चर्चा   
दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये द्विपक्षीय चर्चा झाली होती. द. कोरियाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून हे यांनी म्हटले होते की, प्याँगयांगने अण्वस्त्रबंदीची हमी दिली तरच उभय देशांत समेट शक्य आहे. त्यानंतर उभय देशांत तणाव वाढला होता. सीमेवरील शस्त्रस्पर्धा थांबवण्याच्या मूळ मुद्द्यावर दक्षिण कोरियाचा भर असेल असे आता संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ही उच्चस्तरीय चर्चा झालीच तर २०१५ नंतरची ही पहिली अधिकृत बोलणी असेल.  

उत्तर कोरियाच्या सकारात्मक प्रतिसादाचा रेडक्रॉसला विश्वास 
उत्तर कोरिया या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देईन अशा विश्वास रेडक्रॉसने व्यक्त केला. कोरियन युद्धकाळात ताटातूट झालेल्या कुटुंबांना पुन्हा भेटवण्याचा रेडक्रॉसचा प्रयत्न ऑक्टोबरपर्यंत यशस्वी होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय बोलणी अपेक्षेनुसार झाल्यास हे शक्य आहे. युद्धकाळात लाखो कुटुंबे विभक्त झाली होती. अनेक लोक आपल्या सीमेपलीकडील आप्तांशी बोलूही शकले नाहीत. त्यांचा या युद्धात बळी गेला होता. युद्धानंतर केवळ ६० हजार सैनिक वाचले होते.
बातम्या आणखी आहेत...