आदिस अबाबा - दक्षिण सुदानमधून आलेल्या सशस्त्र लोकांनी इथिओपियात १४० जणांची हत्या केली तसेच ३९ मुलांचे अपहरण केले. इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता तेवोल्दे मुलुतेग यांनी सांगितले की, मुर्ले कबिल्याच्या बंदूकधारी व्यक्तींनी गम्बेलाजवळ हा हल्ला केला. माहितीमंत्री गेटाश्यू रेडा यांनी सांगितले की, आमच्या लष्कराने हल्लेखोरांना दूरवर हाकलले आहे. त्यापैकी ६० जणांना ठार मारण्यात आले आहे. इथिओपियाचे लष्कर दक्षिण सुदानमध्ये घुसले होते की नाही हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मात्र, या घटनेत दक्षिण सुदानच्या सरकारचा हात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुर्ले हा दक्षिण सुदानच्या जोंगलेई या पश्चिमेकडील राज्यातील कबिला आहे. तेथील लोक जनावरे चोरण्यासाठी नेहमीच शेजारील देशांत हल्ला करतात. गम्बेला हा इथिओपियाचा एक भाग असून तो दक्षिण सुदानपासून फक्त ५० किलोमीटर दूर आहे.