आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ground Report : चीनचा संताप कुपुपमध्ये स्पष्ट जाणवतोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकलामच्या अलीकडे कुपुप हे गाव आहे. तेथे सुमारे २०-२५ कुटुंब अशा लहान-लहान घरांत राहतात. लोकांना सतर्क करण्यासाठी ‘तुम्ही चीनच्या निगराणीत आहात’ अशा आशयाचे फलक तेथे जागोजागी लावले आहेत. - Divya Marathi
डोकलामच्या अलीकडे कुपुप हे गाव आहे. तेथे सुमारे २०-२५ कुटुंब अशा लहान-लहान घरांत राहतात. लोकांना सतर्क करण्यासाठी ‘तुम्ही चीनच्या निगराणीत आहात’ अशा आशयाचे फलक तेथे जागोजागी लावले आहेत.
कुपुप हे चीन सीमेला अगदी लागून असलेले गाव. सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीचे हे गाव पहिले साक्षीदार असते. गावात प्रवेश करण्याआधीच बाबा हरभजन सिंह यांचे मंदिर दिसते. ते लोंगेवालाचे युद्ध जिंकणाऱ्या २३ पंजाब रेजिमेंटमध्ये तैनात होते.  लष्करातील जी तुकडी येथे येते, ती या मंदिराचे संचालन करते. येथून जाणारे लष्कराचे अधिकारी आणि जवान त्यांना सलामी देऊनच पुढे जातात. बाबांमुळेच भारत आणि चीन सीमेवर अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित आहे, असे ग्रामस्थ म्हणतात. पण सध्या परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. कंजनजंगा पर्वतरांगांजवळ १५ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर डोकलाम हा चराऊ पठार असलेला भाग आहे. गेल्या महिनाभरापासून भारतीय लष्कर आणि चीनचे लष्कर यांच्यातील तणावाचे हेच केंद्रस्थान आहे. तेथे सध्या फक्त लष्कराचे जवान आणि रस्ते तयार करणाऱ्यांनाच जाण्याची परवानगी आहे, तीही कडक तपासणीनंतरच. चीन तेथे रस्ता तयार करण्याचे मनसुबे बाळगून आहे, पण भारतीय लष्करही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देत आहे. कुपुप येथून डोकलामचे हवाई अंतर अडीच किमीपेक्षाही कमी आहे. तेथून पुढे कोणालाही जाऊ दिले जात नाही.  
 
कुपुपमध्ये राहणारे दावा शेरपा यांनी सांगितले की, मी अनेक वर्षांपासून येथे राहतो. जंगली याक आणि जनावरांना चारण्यासाठी गावातील लोक नेहमी डोकलामपर्यंत जात होते. आधी कधीही तेथे चीनच्या हालचाली दिसल्या नाहीत. पण एक महिन्यापासून चिनी लष्कर रस्ते निर्मितीच्या संसाधनांसह त्यांच्या सीमेत ठाण मांडून आहे. त्यानंतर याक आणि जनावरांना चारणे तर बंदच झाले आहे. तेथून कोणालाही पुढे जाऊ दिले जात नाही. ग्रामस्थ आणि रस्ते बांधकामावरील काही मजुरांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या लष्करांत तणाव खूपच वाढला आहे. एखादे वादळ येण्याआधीची ही शांतता आहे. मात्र, युद्ध होईल, असे वाटत नाही.  
 
सिलिगुडी कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवणाऱ्या चीनने ही योजना यशस्वी करण्यासाठी आपल्या भागात रस्ते तयार केले आहेत. आता भारतीय सीमेपासून फक्त सहा किंवा सात किमी दूर असलेल्या डोकलाममध्ये, ज्याला चीन डोकलांग सांगून आपला भाग म्हणतो, रस्ते बांधणीची पूर्ण तयारी केली आहे. याबाबत लष्कराचे जवान किंवा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते सुरक्षेचे कारण सांगून पुढे जाण्यास रोखतात. दुसरीकडे, भारतानेही आपल्या सीमा भागात रस्ते आणि लढाईच्या दृष्टीने बंकर बनवण्यास सुरुवात केली आहे. तेथून पाच किमी अंतरावरील ट्राय जंक्शनच्या (भारत, भूतान आणि चीनच्या सीमा मिळतात) चौकीवर प्रत्येकाचे स्कॅनिंग होत आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू असतानाही दोन्ही देशांचे लष्कर समोरासमोर आहे. कुपुपहून डोकलामपर्यंतचा रस्ता मुसळधार पावसामुळे नादुरुस्त होत आहे. त्यामुळे बीआरओ स्थानिक मजुरांकडून त्याची लगेचच दुरुस्ती करत आहे.  
 
चीनने गेल्या २० जूनला भारतीय लष्करासोबत झालेल्या फ्लॅग मीटिंगमध्ये डोकलामला आपला भाग असल्याचे सांगत तेथपर्यंत रस्ता तयार केल्याची माहिती दिली होती. भारताने त्वरित त्याला विरोध केला. त्याआधी १६ जूनला रस्ता तयार करणारे पथक चिनी लष्करासोबत डोकलामला येण्यास सुरुवात झाली. यादरम्यान तेथे उपस्थित भारतीय लष्कराने मोठा विरोध करत वाहने रोखली होती. कुपुपमध्ये राहणाऱ्या पसंग लामो यांनी सांगितले की, माझी महिला नातेवाईक नियमितपणे रस्ता बनवण्यासाठी डोकलामपर्यंत जाते. त्या दिवशी भारतीय लष्कराने चिनी वाहनांना रोखले होते. चिनी सैनिकांनी त्याला विरोध केला, पण आपल्या सैनिकांनी वाहनांना पुढे जाऊच दिले नाही. त्यानंतरच चीन त्यांच्या भागात बऱ्याच उंचीपर्यंत रस्ता तयार करत आहे. पण भारताच्या विरोधानंतर पुन्हा डोकलामकडे येण्याचा प्रयत्न चीनने केला नाही. त्यांनी सांगितले की, चीनच्या लष्कराने तेथे ठाण मांडले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेथे रस्ता तयार करणाऱ्या स्थानिक मजुरांना पूर्ण तपासणीनंतरच पुढे जाऊ दिले जात आहे. त्यांच्या इनर लाइन परमिटव्यतिरिक्त लष्करातर्फेही पडताळणी करून पुढे पाठवले जात आहे. युद्ध झालेच तर आम्हाला गाव रिकामे करून खालच्या बाजूला जावे लागेल. जेव्हापासून डोकलाममध्ये भारतीय लष्कराने चीनला मागे सरकवले तेव्हापासून त्याचा संताप या ट्राय जंक्शनमध्ये स्पष्टपणे जाणवतो. भारताच्या प्रत्येक हालचालीवर चीनची तीक्ष्ण नजर आहे.  या भागात गेल्या सात वर्षांपासून बांधकाम करणारे दिलीप थापा यांचे म्हणणे आहे की, सध्या नथू ला खिंडीपासून ते डोकलाममध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची व्हिडिओग्राफीही केली जात आहे. दुसरीकडे, कुपुप आणि त्याच्या पुढील भागात तैनात लष्कराच्या विविध तुकड्यांच्या जवानांनी तणाव असल्याचे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले, पण डोकलामचा उल्लेख करताच ते गप्प बसले. तणाव असला तरीही दोन्ही देशांत नाथू ला खिंडीतून व्यापार सुरूच आहे.  

कुपुपच्या अलीकडे जुपुप हे एक गाव आहे. तेथे राहणारे पेमा भुतिया यांनी १९६२ पासून ते आजपर्यंतचे वातावरण अनुभवले आहे. त्यांनी सांगितले की, चीनने २००६ मध्ये भूतानच्या बटांगला खिंडीवर ताबा मिळवला होता. तेथून सुमारे १० किमीपेक्षा जास्त भागात चीनने रस्ता तयार केला होता. त्यानंतर एक वर्षाने उत्तर सिक्कीममधील फिंगर टॉपच्या भागावरही चीनने आपला दावा केला होता, पण भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. आता एक दशकानंतर चीनने पुन्हा डोकलाममध्ये त्याची पुनरावृत्ती करण्याचा कट रचला आहे. 
 
कुपुप (सिक्कीम)  येथून डी. डी. वैष्णव यांचा वृत्तांत