आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेत बंडाचा प्रयत्न भारत उधळून लावेल, श्रीलंकेचे मंत्री दिस्सानायके यांना विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेत लष्कराची राजवट भारत खपवून घेणार नाही. देशात लष्करी बंडाचा प्रयत्न झाल्यास तो मोडून काढण्यासाठी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना भारत पूर्णपणे पाठिंबा देईल, असा विश्वास श्रीलंकेचे वरिष्ठ मंत्री एस. बी. दिस्सानायके यांनी सोमवारी व्यक्त केला. विरोधकांनी देशात लष्करी बंड घडवून आणण्याचा इशारा दिल्याच्या वृत्तानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

श्रीलंकेचे सामाजिक सेवा खात्याचे मंत्री एस. बी. दिस्सानायके यांनी ‘नेथ एफएम रेडिओ’ला सांगितले की, सिरिसेना यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे श्रीलंकेत लष्करी बंडाचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडण्यासाठी ते भारताच्या पाठिंब्यावर विश्वास ठेवू शकतात. भारत दोन जहाजे पाठवेल.

संयुक्त विरोधी पक्षांचे संसदीय नेते दिनेश गुणवर्धना यांनी शुक्रवारी संसदेत २०१७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सांगितले होते की, ‘श्रीलंकेत सरकार लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशात लष्करी बंड होण्याचा धोका आहे.’ त्या वेळी अध्यक्ष सिरिसेना हेही सभागृहात उपस्थित होते. गुणवर्धना यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन पाठिंबा दिला होता. त्यामुळे देशात लष्करी बंड होते की काय, अशी शंका व्यक्त होत होती.

गेल्या वर्षी सिरिसेना यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेले माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पराभवासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाला दोषी ठरवले होते. संयुक्त विरोधी पक्षांनी राजपक्षे यांच्या या आरोपाला पाठिंबा दिला होता.
बातम्या आणखी आहेत...