आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर-जम्मू महामार्ग तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टीमुळे बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस व बर्फवृष्टी होत  असल्याने  श्रीनगर-जम्मू हा ३०० किमी लांबीचा महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. श्रीनगरवासीयांची सकाळच मुळी हलक्या बर्फवृष्टीने झाली. संपूर्ण शहर बर्फाच्या पातळ आवरणाने आच्छादले होते. गेल्या चोवीस तासांत जोरदार बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सलग चौथ्या दिवशी सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून बर्फवृष्टी होत आहे.  काश्मीरला जोडणाऱ्या देशातील सर्व रस्त्यांवर बर्फ साचला आहे. यातून पर्यायी मार्ग काढण्याचा सीमा रस्ते संघटनेचा प्रयत्न सुरू आहे.  
 
वाहतूक विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि जम्मूकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर बर्फ साचला आहे. त्यामुळे जवाहर बोगद्यात आणि पाटणी टॉप भागातील रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली आहे. या बोगद्यात सुमारे दहा इंच बर्फाचा थर साचला असल्याची माहिती त्यांनी दिली. येथे दरडी कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.  त्यामुळे रस्त्यावर मलबा साचलेला आहे. चेश्मा, अनोखी धबधबा आणि पंत्याला आणि दिघोळ भागातील रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अडथळेे निर्माण झाले. रस्ते साफ करण्याचे काम जोमाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. उत्तर काश्मीरमधील गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टवर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू होती.  गुलमर्ग भागात १५ इंच बर्फाचा थर साचला आहे. श्रीनगरातही २.५ सेंटीमीटरचा थर साचला आहे. गुलमर्ग खोऱ्यातील अतिशय थंड हवेचे ठिकाण असून  रात्रीचे तापमान उणे ५ अंश सेल्सियस होते, तर श्रीनगरात २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. काझीगंुड, कोकरनाग आणि कुपवाडा  भागात शून्य अंश तापमान नोंदले गेले.  लेह आणि लदाख थंड हवेचे प्रदेश असून येथे सर्वात कमी म्हणजे उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. खोऱ्यात येत्या दोन तासांत बहुतांश भागात पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बातम्या आणखी आहेत...