आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका हत्याकांड : हल्ल्यानंतर फक्त २० मिनिटांत केली सर्व २० ओलिसांची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका येथील कॅफेमध्ये दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच सर्व २० ओलिसांची हत्या केली होती, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक एकेएम शाहीदुल हक यांनी सोमवारी दिली. पोलिसांनी बचावकार्य उशिरा सुरू केल्याचा माध्यमांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. हक म्हणाले की, पोलिसांनी बचावकार्य उशिरा सुरू केले, असा आरोप माध्यमे करत आहेत. पण वस्तुस्थिती तशी नाही. आम्ही ही मोहीम फक्त १२ तासांत फत्ते केली.

खैरूलचा तीन हल्ल्यांत सहभाग
खैरूल हा दहशतवादी बोगरा येथील असून त्याने तेथील मदरशात शिक्षण घेतले होते. वायव्य प्रांतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सात महिन्यांपासून वाँटेड होता. त्यानेच शुक्रवारच्या हल्ल्याचे नेतृत्व केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. बोगरा पोलिसांनी त्याच्या पालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दोघांना अटक, ओळख उघड करण्यास नकार
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी २ जणांना अटक केली. मात्र, त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत किंवा त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे हेही सांगण्यात आले नाही. हक म्हणाले, ते दोघेही आजारी आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल. त्यापैकी एक जण रुग्णालयात आहे, तर दुसरा कोठडीत आहे. हल्लेखोरांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंध असू शकतात, अशी टिप्पणीही हक यांनी केली. तत्पूर्वी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि तेथील लष्कराने म्हटले होते की, घटनास्थळावरून एका दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे. मात्र, त्याची ओळख उघड करण्यात आली नव्हती.

हल्लेखोर सुशिक्षित एक जण आहे हसीनांच्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा
हल्ल्याच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व हल्लेखोर विशीतील अाहेत. हल्लेखोरांपैकी चौघांची पृष्ठभूमी आम्ही शोधून काढली आहे. ते श्रीमंत कुटुंबातील असून ढाका आणि परदेशातील प्रख्यात शाळा आणि विद्यापीठांत त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. ठार झालेला एक दहशतवादी रोहन इम्तियाज हा पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्याचा मुलगा आहे. रोहन डिसेंबरपासून बेपत्ता होता. एक दहशतवादी मलेशियन विद्यापीठात शिक्षण घेत होता. तो मायदेशी कधी परतला याची माहिती नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...