आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाविरुद्ध लढा देऊ; नंतर 'युनो'तील धोरण ठरवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासमोर दहशतवादाविरुद्ध पहिल्यांदा एकत्रित लढा देऊ, त्यानंतर तुम्ही संयुक्त राष्ट्रातील धोरण ठरवा, अशी रोखठोक भूमिका मांडली. स्वराज यांनी वांग यांच्यासमोर पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरचाही मुद्दा उपस्थित केला. मसूदला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्तावाला चीनने आडकाठी आणली आहे. स्वराज यांनी भारत-चीन-रशिया परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर वांग यांच्यासमोर मसूदचा मुद्दा मांडला.

दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात राहतील यावर सहमती व्यक्त करण्यात आली. चीनने या महिन्याच्या सुरुवातीला मसूदबाबतच्या प्रस्तावाला विरोध केला. पाकिस्तानी दहशतवादी संघटना आणि अतिरेक्यांविरुद्ध भारताच्या प्रस्तावाला चीनने याआधीही विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्राने २००१ मध्ये जैश-ए-मोहंमदवर बंदी घातली. मात्र, त्यानंतर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर मसूद अझहरवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न चीनने पॉवरद्वारे यशस्वी होऊ दिले नाहीत. गेल्या जुलै महिन्यात भारताने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहेमान लखवीच्या सुटकेबद्दल पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रात केली होती. मात्र, त्या वेळीही चीनने भारताच्या प्रयत्नांना खोडा घातला होता. त्या वेळी चीनने म्हटले होते की, त्यांची भूमिका वस्तुस्थितीवर आधारित असून वास्तविकता आणि निष्पक्षतेशी अनुकूल होती. यासोबत त्यांनी नवी दिल्लीशी संपर्कात
असल्याचा पुन्हा दावा केला. या आठवड्याच्या सुरुवातीस भारताने गुप्त व्हेटोच्या वापरावर टीका करत उत्तरदायित्वाची मागणी केली होती. जागतिक संस्थांतील सर्वसाधारण सदस्यांना अतिरेक्यांविरुद्ध बंदी लादण्याची त्यांची मागणी का नाकारली जात आहे, याचे कारणही त्यांना दिले जात नाही.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेत अतिरेकी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या धोक्याबाबतच्या चर्चेत स्पष्ट भूमिका मांडली. अल कायदा, तालिबान आणि आयएसआयएसशी संबंधित निर्बंध समित्यांच्या प्रक्रियेतील सर्वसंमतीेचा आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे अकबरुद्दीन म्हणाले होते. सर्वसंमती आणि गोपनीयतेच्या प्रक्रियेतील निष्कर्ष उत्तरदायित्वाच्या अभावाच्या रूपात समोर येतो.
लवकर बैठका व्हाव्यात
स्वराज यांनी वांग यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भाषणाच्या सुरुवातीस त्यंानी म्हटले की, गेल्या वर्षभरात संबंधांत सुधारणा झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा वाढावी यासाठी लवकर बैठका व्हाव्यात. आम्ही दीर्घ अवधीनंतर भेटत आहोत. मला वाटते लवकर भेटले पाहिजे. जगात अनेक घटना वेगात घडत आहेत, त्यामुळे ते आवश्यक ठरते. चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, भारत आणि चीन दोन मोठे देश आणि दोन मोठे शेजारी आहेत. निकटचे सहकार्य कायम ठेवणे ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. आम्ही दोन उगवत्या अर्थव्यवस्था आहोत. दोन्ही देश आर्थिक विकासाला चालना देण्याच्या आव्हानाचा सामना करत आहोत.