आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे जगभर थेट प्रक्षेपण, टाइम्स स्क्वेअरवर स्वराज यांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या २१ जून या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवरून जगभर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या वेळी उपस्थित राहतील. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून आणि आमसभेचे अध्यक्ष सॅम कुटेसा यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी योग दिन साजरा केला जाणार आहे.

भारतीय पथकाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे विशेष व्याख्यान आणि मार्गदर्शन होणार आहे. टाइम्स स्क्वेअरवर जमा होणाऱ्या हजारो प्रेक्षकांना हा योग दिन कार्यक्रम अनुभवता येणार आहे. याशिवाय टाइम्स स्क्वेअरवर हजारो लोक त्याच दिवशी योग क्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती युनोतील भारतीय मिशनने दिली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मॅडिसन स्क्वेअरवर केलेल्या ऐतिहासिक भाषणाची ध्वनिचित्रफीत इलेक्ट्रॉनिक बिलबोर्ड््सवर दाखवली जाईल. भारतीय वंशाचे अमेरिकी आणि अन्य संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओव्हरसीज व्हाॅलेंटियर फॉर बेटर इंडिया (ओव्हीबीआय) अमेरिकेतील १०० शहरांमध्ये योगाथॉन कार्यक्रम घेणार आहेत. यामध्ये ७० पेक्षा जास्त संघटना सहभागी होतील.

आमसभेतील भाषणात मोदींनी केले होते सूतोवाच
संयुक्त राष्ट्राने गेल्या वर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. साधारण १७७ देशांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना मोदींनी योग दिनाची संकल्पना मांडली. यानंतर युनोतील भारतीय मिशनने सर्व १९३ देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. २२ ऑक्टोबर रोजी सर्वसंमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...