आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दबावतंत्र : सिरियामधून सैन्य माघारीस सुरुवात, रशियाची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सिरियातील मानवी संहार थांबण्याची चिन्हे आहेत. रशियाने सिरियातील आपले सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा आणि त्यांचे रशियन समकक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यातून सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

शांतता चर्चेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी रशियाकडून तयारी दाखवण्यात आली आहे. पुतीन यांनी सैन्याची अंशत: माघार घेणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्या दृष्टीने उभय नेत्यांमधील चर्चेला महत्त्व आहे. दोन्ही नेत्यांत दूरध्वनीवरून याबाबत चर्चा झाली. त्यात सैन्य माघारी घेण्याची पुतीन यांनी तयारी दर्शवली. गेल्या सहा महिन्यांपासून रशियाच्या हवाई दलाने सातत्याने सिरियात हवाई हल्ले चढवले. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांच्या विरोधातील गटांचा खात्मा करण्याची मोहीमच रशियाने हाती घेतली होती. त्यासाठी रशियाने सहा महिन्यांपूर्वी ५० लढाऊ विमाने पाठवली होती. त्या माध्यमातून देशभरात हजारो हल्ले करण्यात आले. तेव्हा सिरियातील हिंसाचार तातडीने थांबला पाहिजे, अशी भूमिका अमेरिकेने सुरुवातीपासून घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर रशियाने केलेली ही घोषणा सिरियासाठी दिलासा देणारी आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राकडून सातत्याने दबाव वाढल्याने असाद सरकार आणि विरोधक यांच्यातील चर्चेला सोमवारी सुरुवात झाली. जिनिव्हामध्ये ही चर्चा सुरू होती, परंतु देशात असाद यांना राजकीय भविष्य राहणार नाही, अशी भूमिका जाणकारांनी व्यक्त केली आहे.
रशियाचे सैन्य मायदेशी जाणार असल्याने सिरियातील राजकीय स्थैर्याचा मार्गही मोकळा होणार आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात सिरियात सुमारे २ लाख ७० हजारांवर नागरिकांचे प्राण गेले आहेत, तर लाखो नागरिक बेघर झाले. मंगळवारी रशियाचे लष्करी साहित्य मायदेशी रवाना झाले.
दुसऱ्या दिवशीही चर्चा
पुतीन यांनी सोमवारी मोहीम संपत अाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रशियाकडून मंगळवारी एकही हवाई हल्ला झाला नाही. दोन दिवसांपासून हिंसाचार थांबलेला आहे. दुसरीकडे सिरियातील विरोधक आणि असाद सरकार यांच्यातील शांतता चर्चेला वेग आला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरू होती.
उद्दिष्ट पूर्ण
सिरियात आमचे एक लष्करी उद्दिष्ट होते. ते आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रदेशातील रशियन सैन्य मायदेशी परतणार आहे. त्याबाबत सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, असे पुतीन यांनी जाहीर केले.