आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर तालिबान म्होरक्या मुल्ला आेमर झाला मवाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या १३ वर्षांपासूनच्या लढाईला संपवण्यासाठी गेल्या आठवड्यात झालेल्या शांतता बैठकीचे तालिबान म्होरक्या मुल्ला आेमरकडून मवाळ भाषेत समर्थन करण्यात आले आहे. इस्लामच्या शत्रूशीदेखील चर्चा केली जाऊ शकते. इतिहासात तसे दाखले सापडतात, असे तालिबानी म्होरक्याने म्हटले आहे.आपल्या धार्मिक परंपरा पाहाव्यात. त्यात शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी चर्चेचा मार्ग दिसून येतो.
शत्रूशी चर्चा करण्यावर त्यात अजिबात बंदी नाही. चर्चेच्या मार्गानेदेखील आपली उद्दिष्टे साध्य करणे शक्य होऊ शकेल. प्रेषित मोहंमद पैगंबर यांना नास्तिकांशी लढावे लागले होते. परंतु त्यांनी लढता-लढता मुस्लिमांसाठी लाभदायी असलेल्या करारांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी नास्तिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती, असा दावा आेमर आपल्या संदेशातून केला आहे. ईदच्या पूर्वसंध्येला आेमरने दिलेल्या संदेशात चर्चेचे समर्थन केले.

ध्येयपूर्तीमुळे शेवट
राजकीय संघर्ष, विविध देशांसोबत असलेली चर्चा आणि अफगाणमध्ये स्वतंत्र इस्लामिक व्यवस्था उभी करण्याचे आपले ध्येय होते. त्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता संपत आला आहे. त्यामुळे ध्येयपूर्ती होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. म्हणूनच लढाईचा शेवट आला आहे, असे मुल्ला आेमरने म्हटले आहे.

शेजारी देशांशी हवेत चांगले संबंध
तालिबानला अफगाणिस्तानसोबतच शेजारील देशांसोबतदेखील चांगले संबंध हवे आहेत. जगभरातदेखील संघटनेचे मोठ्या प्रमाणात पाठीराखे आहेत, असे तालिबानी म्होरक्याने म्हटले आहे.

२००७ नंतर पहिलाच संदेश
तालिबानी म्होरक्या आेमरने ईदच्या निमित्ताने २००७ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा संदेश जारी केला आहे. २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने तालिबानी सरकारची हकालपट्टी केली होती.

हवाई हल्ल्यात १४ ठार
इस्लामाबाद - उत्तर वझिरिस्तानमधील आदिवासी भागात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात १४ दहशतवादी ठार झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने बुधवारी हा हवाई हल्ला केला. यात किमान १४ दहशतवादी ठार झाले. यात दहशतवादी गटाच्या काही म्होरक्यांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर या भागात अनेक दहशतवाद्यांचे मृतदेह विखुरलेले दिसत होते. अल्वारा भागात ही कारवाई करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...